मंदिरावरून पडली चौकाला नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:24 AM2021-03-14T04:24:01+5:302021-03-14T04:24:01+5:30
सांगली : शहरातील विविध चौकांची नावे तेथील देवदेवतांच्या मंदिरावरून पडली आहेत. पूर्वी सहा गल्ल्यांची सांगली होती. सांगलीच्या वेशीवर मारुतीचे ...
सांगली : शहरातील विविध चौकांची नावे तेथील देवदेवतांच्या मंदिरावरून पडली आहेत. पूर्वी सहा गल्ल्यांची सांगली होती. सांगलीच्या वेशीवर मारुतीचे मंदिर होते. कालांतराने शहराचा विस्तार झाला. या मारुती मंदिरावरूनच मारुती चौक हे नाव रूढ झाले. मुख्य बाजारपेठेत भगवान बालाजीचे मंदिर आहे. त्यावरून बालाजी चौक हे नाव पडले. बायपास रस्त्यावर नव्याने शिवशंभो चौक तयार झाला आहे. बायपास रस्ता होण्यापूर्वीपासून तिथे स्वामी नावाच्या शेतकऱ्याने शंकराचे मंदिर उभारले होते. बायपास रस्त्याच्या भूसंपादनात त्याची काही जागा गेली. त्यांनी रस्त्याकडेला नव्याने शंकराचे मंदिर बांधले. तेव्हापासून हा चौक शिवशंभो चौक म्हणून ओळखला जाऊ लागला. राममंदिर चौकालाही नाव या परिसरातील मंदिरावरूनच देण्यात आले. कुपवाड रस्त्यावर लक्ष्मी मंदिर आहे. त्यावरून लक्ष्मी देऊळ चौक असे नामकरण झाले.
१६००च्या दशकात बाबा हजरत गारपीर ऊर्फ नालपीर यांचे शहराबाहेरील परिसरात वास्तव होते. तेव्हा हा भाग जंगलमय होता. तिथेच त्यांची समाधी आहे. कालांतराने शहर विस्तारले. बाबा गारपीर यांची समाधी व दर्गा यामुळे या चौकाला गारपीर चौक म्हटले जाऊ लागले. आता शिवशंकर चौक असेही नामकरण केले आहे.