राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराला ६२ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 05:45 AM2020-03-04T05:45:27+5:302020-03-04T05:45:30+5:30
खानापूर तालुक्यातील देविखिंडी व सुळेवाडी (विटा) हद्दीतील दगड रॉयल्टी चुकवून विनापरवाना वापरल्याप्रकरणी विटा महसूलने कंपनीला ६२ लाख २२ हजार ८४० रुपयांचा दंड आकारला आहे.
विटा (जि. सांगली) : गुहागर ते विजापूर या विटामार्गे नव्याने बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी ठेकेदार कल्याणराज देसाई कंपनीने खानापूर तालुक्यातील देविखिंडी व सुळेवाडी (विटा) हद्दीतील दगड रॉयल्टी चुकवून विनापरवाना वापरल्याप्रकरणी विटा महसूलने कंपनीला ६२ लाख २२ हजार ८४० रुपयांचा दंड आकारला आहे. संबंधित ठेकेदाराच्या बिलातून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
गुहागर ते कडेगाव, विटा, खानापूर, भिवघाटमार्गे विजापूर या राष्टÑीय महामार्गाचे काम गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून सुरू आहे. हे काम कल्याणराज देसाई कंपनीने घेतले आहे. त्या कामासाठी लागणारी खडी तयार करण्याचे काम देविखिंडी येथे सुरू आहे. त्यामुळे कंपनीचे खडीक्रशर त्याठिकाणी लावण्यात आले आहेत. या क्रशरला लागणारे दगड संबंधित कंपनीने जवळच असलेल्या टेंभू जलसिंचन कालव्याच्या बाजूचे वापरले आहेत. देविखिंडी येथे टेंभू कालव्याच्या बाजूला असलेले सुमारे १ हजार १५३ ब्रास दगड ठेकेदाराने विनापरवाना व रॉयल्टी न भरता घेतले आहेत, तसेच विटा येथील सुळेवाडी हद्दीत असलेल्या टेंभू योजनेच्या कालव्यावरील ६५० ब्रास दगड घेतला. सुमारे १ हजार ८०३ ब्रास दगडाचा चोरून वापर केला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी संबंधित कंपनीला दि. १६ जानेवारी रोजी ३८ लाख ९७ हजार
७९० रुपये, तर दि. १८ फेबु्रवारीला
२३ लाख २५ हजार ५० रुपये असा एकूण ६२ लाख २२ हजार ८४० रुपयांचा दंड आकारला.
।दंडाची रक्कम बिलातून वसूल करणार
दंड भरण्याबाबत ठेकेदार कंपनीला आदेश देण्यात आले आहेत. ही रक्कम कंपनीने शासनाकडे जमा केली नाही, तर त्यांच्या राष्टÑीय महामार्ग तयार करण्यासाठी देण्यात येणाºया देयकांमधून (बिलातून) वसूल करून देण्याबाबत राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभागाला कळविले असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गासाठी पाझर तलावातून मुरूम उत्खनन करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला परवानगी दिली आहे. या मुरमाची रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. खानापूरजवळ असलेल्या पाझर तलावातून मुरूम घेण्यास ठेकेदाराला परवानगी दिली आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी आकारली जात नाही, असे विटा महसूल प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.