सांगली : जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमास पालकमंत्री जयंत पाटील यांना बोलावून तुम्हीच कार्यक्रमावर बहिष्कार घालून अपमान केला आहे. याबद्दल जि. प. अध्यक्षांनी माफी मागावी, अशी राष्ट्रवादी सदस्यांनी आक्रमक मागणी केली. तुम्ही माफी मागितली नाही तर जिल्हा परिषदेचा करेक्ट कार्यक्रम होईल, असा इशाराही राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दिला. यावर अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी माझ्या कुटुंबात दु:खद घटना घडल्यामुळे मी येऊ शकले नाही. मी साहेबांशी याबाबत बोलून खुलासा करते, असे स्पष्टीकरण दिले.
जिल्हा परिषदेने मंगळवारी घेतलेल्या आरोग्य विभाग आणि सरपंच कार्यशाळेसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांना रीतसर निमंत्रण दिले होते. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष यांसह भाजपा सभापतींनी बहिष्कार टाकला होता. या विषयावरुन राष्ट्रवादीने आक्रमक होत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.
याबाबत संभाजी कचरे म्हणाले, पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनमधून सर्व सदस्यांना समान निधी दिला आहे. असे असताना त्यांच्या कार्यक्रमाला पदाधिकारी अनुपस्थित राहिले. ही बाब निंदनीय आहे. आपण बोलावून पुन्हा गैरहजर राहणे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे आगामी निधीवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी पालकमंत्र्यांची दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली.
शरद लाड, संजय पाटील, संजीवकुमार पाटील, सतीश पवार यांनी कचरे यांना साथ देत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर प्राजक्ता कोरे यांनी मला पालकमंत्र्यांचा अपमान करायचा नव्हता. कुटुंबात दुःखाची घटना घडल्याने मी कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. त्यानंतर माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी अध्यक्ष कोरे यांना पालकमंत्र्यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. कोरे यांनी त्यास सहमती दिल्याने वादावर पडदा पडला.
चौकट
अधिकारी सुपारी घेऊन काम करतायत
पंचायत समितीचे अधिकारी मंत्र्यांची सुपारी घेऊन कामे करीत आहेत, असा आरोप जितेंद्र पाटील यांनी केला. तसेच आम्हीही सरकारमध्ये असल्यामुळे सुपारी बहाद्दर अधिकाऱ्यांचा कारभार चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावर राष्ट्रवादीचे संभाजी कचरे, संजीव पाटील यांनी मर्यादा सोडून पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करु नका, सुपारी घेऊन कोण कामे करते ते जनतेला माहीत आहे. तुमच्या ग्रामपंचायतीने मोठ्या मनाने रस्त्याच्या कामाला एनओसी देण्याची गरज होती, असा टोला जितेंद्र पाटील यांना लगावला.