मालगाव : मिरज विधानसभा मतदारसंघात दोन वेळा निवडून आलेला तिसऱ्यांदा निवडून येत नाही, हा मतदारसंघाला लागलेला शाप हॅट्ट्रिक करीत खोडून काढला. तीन वेळा आमदार, दोन वेळा मंत्री आणि मतदारसंघाला पालकमंत्र्यांचा मिळालेला मान, हे श्रेय मतदारसंघातील जनतेचे आहे. भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.खाडे यांनी मिरज पूर्व भागाचा दौरा केला. ते सिद्धेवाडी येथील कार्यक्रमात बोलत होते. महावीर खोत, सरपंच रामचंद्र वाघमोडे, सुभाष खोत, रावसाहेब सरगर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. होलार समाजातर्फे राजाराम गेजगे यांनी व सरपंच वाघमोडे, संतोष आंबे, काका खरात, कुमार खोत, राजाराम खोत यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.मंत्री खाडे म्हणाले, मिरज मतदारसंघात मी राहत नसताना मला जनतेने पाठबळ दिले. तीन वेळा आमदार, दोन वेळा मंत्रिपद व पालकमंत्री म्हणून मान मिळाला. विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही. आघाडी शासनाने दिलेली स्थगिती उठवून सिद्धेवाडी येथील रस्त्याच्या कामांना सुरुवात केली जाईल. गावातील मतभेद विसरून विकासकामासाठी एकत्र या समस्या निश्चित सोडवू.मोहन वनखंडे, शामराव खरात, उपसरपंच ताराबाई खोत, सदस्या इंदूताई शिनगारे, प्रथमेश कुरणे, त्रिशला माणगावकर, आनंदा खोत, प्रकाश धडस उपस्थित होते.
भाजप कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष!राष्ट्रवादी हा शरद पवारांचा पक्ष, काँग्रेस सोनिया गांधींचा पक्ष, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची; पण भाजप हा कार्यकर्त्यांचा म्हणून ओळखला जातो. निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षात न्याय मिळतो, त्याचे उदाहरण म्हणजे आपण असल्याचे मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.
पाणी योजनांचे श्रेय भाजपचेजिल्ह्यातील मंजूर पाणी योजनांचे श्रेय वाळव्यातून घेतले जात आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक गावात पाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतल्याने या योजनांचे श्रेय मोदींचे असल्याचे खाडे यांनी सांगितले.