वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीतील युवा नेत्यांच्या ‘लाँचिंग’ची घाई; जयंत पाटील स्वत: लक्ष घालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 04:40 PM2022-07-19T16:40:53+5:302022-07-19T16:41:54+5:30

सत्तापालट झाला तरीही या दोन तालुक्यांत सहकारी संस्थांच्या ताकदीवर या दोघांचे ‘लाँचिंग’ होईलच

NCP state president Jayant Patil's son Prateek Patil and MLA Mansingrao Naik's son Viraj Naik will be active in the municipal elections | वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीतील युवा नेत्यांच्या ‘लाँचिंग’ची घाई; जयंत पाटील स्वत: लक्ष घालणार

वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीतील युवा नेत्यांच्या ‘लाँचिंग’ची घाई; जयंत पाटील स्वत: लक्ष घालणार

googlenewsNext

अशोक पाटील

इस्लामपूर : राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुत्र प्रतीक पाटील यांच्या राजकीय ‘लाँचिंग’साठी तयारी सुरू केली होती, तर शिराळा मतदारसंघातील आमदार मानसिंगराव नाईक यांचे पुत्र विराज नाईक यांना युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद दिले. सत्तापालट झाला तरीही या दोन तालुक्यांत सहकारी संस्थांच्या ताकदीवर या दोघांचे ‘लाँचिंग’ होईलच, असे राष्ट्रवादीतून सांगण्यात येते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर इस्लामपुरात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी स्वत:चा वाढदिवस दणक्यात साजरा केला. त्याद्वारे त्यांनी २०२४ मधील विधानसभेची उमेदवारी निश्चित केल्याचे मानले जाते. इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीतही भाजपचा गट तयार करण्याची त्यांची तयारी सुरू आहे.

वाळवा, शिराळ्यात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन साखर कारखाने, सहकारी बँक, दूध संघ, शिक्षण संस्था कार्यरत असून, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. या माध्यमातून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे. राज्यात कोणाचेही सरकार आले तरीही या संस्था अडचणीत आणणे मुश्कील आहे. यामुळे प्रतीक पाटील यांच्या राजकीय लाँचिंगमध्ये कोणताही अडसर येणार नाही.

शिराळ्यातही अशीच परिस्थिती आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांनीही स्वत:चा वाढदिवस दणक्यात साजरा करून ताकद दाखविली आहे. त्यांचे पुत्र विराज यांनीही सहकारी संस्था व शैक्षणिक संकुलात लक्ष केंद्रित केले आहे. ते युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते आघाडीवर असतील. दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी ताकद दाखविणार आहे.

जयंत पाटील स्वत: लक्ष घालणार

आगामी इस्लामपूर, आष्टा नगरपालिका निवडणुकीत स्वत: जयंत पाटील लक्ष घालणार आहेत. प्रतीक पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवत साजरा करणार आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन लक्ष केंद्रित करणार आहेत.

Web Title: NCP state president Jayant Patil's son Prateek Patil and MLA Mansingrao Naik's son Viraj Naik will be active in the municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.