विद्यापीठांचा प्रशासकीय कारभार सुधारण्याची गरज
By admin | Published: October 30, 2015 11:51 PM2015-10-30T23:51:14+5:302015-10-31T00:08:44+5:30
शेखर गायकवाड : सांगलीत कार्यशाळा
सांगली : शैक्षणिक सुधारणांसाठी राष्ट्रीय पातळीवर धोरण तयार होत असल्याने उच्च शिक्षण क्षेत्रात नवनवीन व विद्यार्थी कल्याणाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशा शैक्षणिक धोरणांच्या निर्मितीअगोदर त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विद्यापीठ स्तरावरील प्रशासकीय कारभार सुधारणे आवश्यक असल्याचे परखड मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी व्यक्त केले. विलिंग्डन महाविद्यालयात जिल्हास्तरीय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. प्राचार्य शांताराम बुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. गायकवाड म्हणाले, उच्च शिक्षण पातळीवर सामाजिक बांधिलकी जोपासणे शक्य असल्याने त्याचा अंतर्भाव धोरणात व्हायला हवा. जगभरात शैक्षणिक क्षेत्रात अनेक सकारात्मक घडामोडी घडत असतात. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या सर्व घडामोडीतून विद्यापीठांची प्रतिमा प्रभावी होईल.कार्यशाळेत ताराराणी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि नवीन शैक्षणिक धोरण निश्चिती कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी शांताराम बुटे यांनी मार्गदर्शक घटकांची माहिती दिली. कार्यशाळेचा अहवाल लगेचच आॅनलाईन पध्दतीने उच्च शिक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आला. प्राचार्य बी. व्ही. ताम्हणकर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)
तज्ज्ञांची गटचर्चा
कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीसाठी दहा घटकांवर आधारित तज्ज्ञांची गटचर्चा पार पडली. यात उच्च शिक्षणातील मूलभूत बाबींची चर्चा, राज्यांची विद्यापीठे व त्यांचा दर्जा, कौशल्य विकसन कार्यक्रम व उच्च शिक्षण यांचा समन्वय, राज्यातील विविधता व भिन्नता, सामाजिकता व लिंगसमभाव यांचा समन्वय, उच्च शिक्षणाची सामाजिक बांधिलकी, उत्कृष्ट शिक्षक कसा विकसित करावा, विद्यार्थी सहाय प्रणालीचे नियमन, भाषेच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मता आणि खासगी क्षेत्रातील संबंध या विषयावर तज्ज्ञांनी मत मांडले.