लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नव्या पिढीचे होकायंत्र म्हणजे ‘शौर्य’ हे पुस्तक आहे. या पुस्तकातून खेळाडूंना यशाची दिशा मिळेल. जो माणूस खेळतो तो जीवनात यशस्वी होतो. म्हणून बलवान समाजनिर्मितीसाठी सांगली जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेचा इतिहास, या पुस्तकातून अभ्यासावा आणि यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी केले.
सांगलीत क्रीडा शिक्षक परशुराम लोंढे यांच्या शौर्य या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी अध्यक्षपदावरून आप्पासाहेब कदम बोलत होते.
प्रा. एम. एस. राजपूत म्हणाले, शौर्य हा क्रीडा अभ्यासकांसाठी ऐवज आहे. जीवनात पराभव पचवता आला पाहिजे. कोणत्या वातावरणात शिकतो, त्याचा परिणाम जास्त असतो. हाॅकीमध्ये भारताचा दबदबा आहे, अशा देशी खेळांची कास धरावी. उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी म्हणाले, शौर्यमधून असामान्य व्यक्तिमत्त्वांचा वेध घेतला आहे. कर्तृत्ववान काळाच्या आठवणी या पुस्तकात दिल्या आहेत.
प्रा. अशोक काळे व कवी दयासागर बन्ने यांनी सहभाग घेतला. त्यांनी सांगली जिल्ह्यातील खेळाडूंच्या जीवनप्रवासाचे व गरुडभरारीचे या पुस्तकात आलेले विश्लेषण केले.
नामदेवराव मोहिते, अनिल पाटील, मयूर सिंहासने, हुसेन कोरबू, अक्षय कदम, अलका केरीपाळे, सोनल साठे, नजरुद्दीन नायकवडी आदींचा सत्कार करण्यात आला. या वेळी क्रीडा अधिकारी तानाजीराव मोरे, श्री. रामचंद्र पांगम, सचिन हरोले, सुनील चंदनशिवे, राजेंद्र भंडारे, अनिल पाटील, गौतम कांबळे, मुबारक उमराणी, सिद्धार्थ लोंढे आदी उपस्थित होते.
सुधाकर माने यांनी स्वागत केले. लेखक परशराम लोंढे यांनी प्रास्ताविक केले. जनार्दन झेंडे यांनी आभार मानले.