नवा महापौर भाजपचा की आघाडीचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:42 AM2021-02-23T04:42:38+5:302021-02-23T04:42:38+5:30

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये पडलेली फूट, घोडेबाजार, काँग्रेस-राष्ट्रवादीतील उमेदवारीचा घोळ अशा रंगतदार स्थितीत मंगळवारी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होत ...

New mayor of BJP or front? | नवा महापौर भाजपचा की आघाडीचा?

नवा महापौर भाजपचा की आघाडीचा?

Next

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये पडलेली फूट, घोडेबाजार, काँग्रेस-राष्ट्रवादीतील उमेदवारीचा घोळ अशा रंगतदार स्थितीत मंगळवारी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. भाजपमधील सात नगरसेवक अजूनही ‘नाॅटरिचेबल’ आहेत. त्यांच्या हाती महापौरपदाची दोरी आहे. भाजपने विजयाचा दावा केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील उमेदवारीचा तिढा सोमवारीही दिवसभरात सुटला नव्हता.

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाईन सभा होत आहे. महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपमधून धीरज सूर्यवंशी, तर काँग्रेसमधून उत्तम साखळकर, राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी, तर उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम, उमेश पाटील, स्वाती पारधी, सविता मोहिते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच फोडाफोडीचे राजकारणही रंगले. भाजपचे नऊ नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले होते. त्यापैकी दोघेजण स्वगृही परतले, तर अजूनही सातजण ‘नाॅटरिचेबल’ आहेत.

दरम्यान, या सातपैकी पाच नगरसेवकांशी संपर्क झाला असून, ते भाजपसोबतच राहतील, असा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. निवडीत कोणतीही अडचण नसल्याचे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादीने मात्र हा दावा फेटाळत सातही नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले. त्यामुळे या सात नगरसेवकांच्या हाती महापौर, उपमहापौरपदाचे भवितव्य आहे.

चौकट

आघाडीचा घोळ

काँग्रेस-राष्ट्रवादीत महापौरपदाच्या उमेदवारीचा घोळ सोमवारीही दिवसभर सुरू होता. विजय बंगल्यावर जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज यांची बैठक झाली. काँग्रेसने अजूनही उत्तम साखळकर यांचा दावा कायम ठेवला आहे, तर राष्ट्रवादीत मैनुद्दीन बागवान की दिग्विजय सूर्यवंशी हा वादही मिटलेला नाही. बैठकीनंतर पालकमंत्री जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याशी संपर्क साधण्यात आला. अखेर एकमत होत नसल्याने मंगळवारी सकाळी उमेदवारीचा फैसला होणार असल्याचे नेत्यांनी सांगितले.

चौकट

काँग्रेसचे नाराज नगरसेवक स्वगृही

काँग्रेसच्या पाच ते सहा नगरसेवकांनी दबाव गट तयार केला होता. गेल्या तीन दिवसांपासून ते बाहेर पडले होते. महापौरपद साखळकर अथवा बागवान यापैकी एकाला द्यावे, अशी या गटाची मागणी होती. हे नाराज नगरसेवकही सायंकाळी आघाडीच्या नगरसेवकांसोबत होते.

चौकट

सहलीवरून परतले

भाजपचे २५ नगरसेवक गोवा सहलीवर गेले होते. ते रात्री कोल्हापूर येथे एका नेत्यांच्या फार्महाऊसवर परतले, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवकही कोल्हापुरातील एका हाॅटेलमध्ये उतरले आहेत. दोन्हीकडील नगरसेवक कोल्हापुरात थांबले असून, भाजपचे नगरसेवक सकाळी सांगलीत परतणार आहेत.

Web Title: New mayor of BJP or front?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.