तीन घराण्यांतील संघर्षाला नवे वळण
By admin | Published: October 7, 2014 11:29 PM2014-10-07T23:29:47+5:302014-10-07T23:38:58+5:30
विधानसभा निवडणूक : पारंपरिक संघर्षाला वारसदारांकडून बळ
अविनाश कोळी - सांगली -वसंतदादा-राजारामबापू यांच्यापासून सुरू झालेला संघर्ष आज ४५ वर्षांनंतरही त्यांच्या वारसदारांनी जिवंत ठेवला आहे. सांगली विधानसभेच्या मैदानात गेल्या सहा वर्षांपासून जयंत पाटील आणि मदन पाटील यांच्यारूपाने या संघर्षाने नवे रूप धारण केले आहे. त्याचबरोबर संभाजी पवार विरुद्ध दादा घराण्यातील संघर्षाची कहाणीही सुरूच आहे. यंदाच्या निवडणुकीत परंपरागत घराणेशाहीतील संघर्षाचे त्रिकुट निर्माण झाल्याने वेगळा इतिहास नोंदला जात आहे.
राज्यातील राजकारणात दादा-बापूंमधील संघर्ष नेहमीच चर्चेत येत असतो. २३ नोव्हेंबर १९६३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे निधन झाले, तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात राजारामबापू व वसंतदादांचे मित्र बॅ. जी. डी. पाटील दोघेही उपमंत्री होते. नाईकांच्या मंत्रिमंडळात राजारामबापूंची बढती करून त्यांना उपमंत्रीपदावरून महसूलमंत्री पदावर बसविण्यात आले. त्यामुळे दादा-बापू संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात वारणा नदीवरील धरणावरून हा संघर्ष विकोपाला गेला. त्यानंतरही अनेक गोष्टींनी या युद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. संघर्षाची ही अर्धशतकीय कहाणी आजही तशीच ताजी आहे.
राजारामबापूंचे पुत्र जयंत पाटील आणि वसंतदादांचे नातू मदन पाटील, प्रतीक पाटील यांच्यात सुरुवातीच्या काळात छुपा संघर्ष होता. महापालिकेच्या २००८ च्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी उघडपणे दादा घराण्याविरोधात रणशिंग फुंकले. दादा घराण्याशी पूर्वापार संघर्ष करीत आलेले संभाजी पवार यांना त्यांनी सोबत घेतले आणि महापालिकेतील मदन पाटील यांची सत्ता हिसकावून घेतली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही असेच राजकारण झाले आणि मदन पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्यावेळी संभाजी पवारांना आमदार बनविण्यासाठी राष्ट्रवादीची पूर्ण ताकद जयंतरावांनी पणाला लावली होती. या खेळांची कल्पना मदन पाटील यांना होती. त्यामुळेच त्यांनीही जयंतरावांना शह देण्याची तयारी चालू केली. नंतरच्या काळात सर्वोदय सहकारी साखर कारखान्यावरून जयंत पाटील आणि संभाजी पवार यांच्यामध्ये वितुष्ट आले. पवारांनी मदन पाटील यांच्याकडील तोफ पश्चिमेला फिरविली आणि जयंतरावांवर टीका केली. जयंत पाटील यांनी शांतपणे पटावरील प्यादे हलविले आणि पुन्हा नव्या डावाला सुरुवात केली. दुसरीकडे दादा व कदम घराण्याने ताकद एकवटली व महापालिकेतील सत्ता पुन्हा काबीज केली. जयंतरावांवर त्यांचाच डाव उलटविण्यात आला.
त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीने या निवडणुकीत संजय पाटील यांचा प्रचार केल्याचे नंतर उजेडात आले. यामागेही जयंतरावच असावेत, अशी चर्चा सुरू झाली. आताच्या विधानसभा निवडणुकीत उघडपणे दोन्ही घराण्यांकडून कुरघोड्या चालू झाल्या आहेत. जयंतरावांनी सांगलीत, तर प्रतीक व मदन पाटील यांनी इस्लामपुरात पट मांडला आहे. एकमेकांच्या राज्यात रसद पुरवून उघडपणे रणशिंग फुंकण्यात आले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात तर घराणेशाहीच्या संघर्षाचे त्रिकुट दिसत आहे. पवार-दादा-बापू घराण्यातील हा संघर्ष याठिकाणी ठळकपणे मांडला जात आहे.
ताकदीचे योद्धे
मदन पाटील, जयंत पाटील आणि संभाजी पवार हे तिन्ही नेते जिल्ह्याच्या राजकारणात ताकदीचे मानले जातात. सध्या जयंतरावांकडे संस्थात्मक तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठे बळ आहे, तर मदन पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे. जिल्ह्यात आजही दादा गट कार्यरत आहे.
संभाजी पवारांना मानणाराही मोठा गट सांगली व परिसरात अस्तित्वात आहे. त्यामुळे तिन्ही नेते एकमेकांविरोधात आपली ताकद पणाला लावत आहेत.
जुन्या संघर्षाला नवा आयाम
राजारामबापू यांचे पुत्र जयंत पाटील आणि वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू असा संघर्ष कधीही झाला नाही. विष्णुअण्णांशीही जयंतरावांचा संघर्ष झाला नाही. जयंतरावांचा थेट दादांच्या नातवांशी संघर्ष सुरू झाला. दुसरीकडे राजारामबापूंचे मानसपुत्र म्हणून संभाजी पवारांचा उल्लेख होतो. तरीही पवारांसह त्यांच्या पुत्राशी जयंतरावांचा संघर्ष सुरू आहे. दादा-बापू घराण्यातील संघर्षात आता पवार घराण्याची भर पडल्याने संघर्षाचा हा तिरंगी सामना भलताच रंगला आहे.