सांगली : शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियानात अमृत शहर गटात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने नववा क्रमांक पटकावला.ही स्पर्धा १५०० गुणांची होती. पृथ्वी ६००, जल ४००, आकाश ३०० तर वायु आणि कागणी यांना प्रत्येकी १०० गुण होते. यामध्ये महापालिकेने ७७२ गुण मिळवले. ४३ शहरांतून नववा क्रमांक पटकावला. या गटात २६ महापालिकांचाही समावेश होता. स्पर्धेच्या २४ निकषात रेन वॉटर हार्वेस्टिंग, रस्त्याकडेला वृक्षारोपण, नवीन हरित ठिकाणे, कचरा व प्लास्टीक व्यवस्थापन, तलावांचे सौंदर्यीकरण, हरित इमारती आदी प्रकारात महापालिकेच्या कामगिरीचे ऑनलाईन सादरीकरण शासनाला करण्यात आले.
तलाव सौंदर्यीकरणात काळी खण व मिरजेतील गणेश तलाव, नवीन हरित ठिकाणांमध्ये न्यू प्राईड समोरील आयुक्त बंगला तसेच समडोळी येथील कचरा डेपो यांचे सादरीकरण झाले. हरित इमारतींसाठी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या बंगल्याचे सादरीकरण जाले. उत्कृष्ट संवर्धन केलेले ठिकाण म्हणून जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या आवारातील विहिरीचे पुनरुज्जीवन सादर करण्यात आले. विहिरीच्या पाण्यावर वृक्षसंवर्धनाची दखल घेण्यात आली. अशी २४ ठिकाणे मायक्रोसॉफ्ट टीमने शासनाला सादर केली.अभियानाचे कार्यक्रम प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे म्हणाले, पंचमहाभूते तत्त्वांच्या अनुषंगाने अभियान आयोजित केले होते. महापालिकेने केलेल्या कामांची खल घेत नवव्या क्रमांकासाठी निवड झाली. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुत राहुल रोकडे, स्मृती पाटील, पर्यावरण अभियंता ऋषीकेश किल्लेददार, वैष्णवी कुंभार, शहर समन्वयक वर्षाराणी जाधव यांच्यासह विभाग प्रमुखांनी अभियानात सहभाग घेतला.पंचतारांकीत घर संकल्पनेचे कौतुकआयुक्त कापडणीस यांच्या संकल्पनेतील पंचतारांकित घर संकल्पनेचेही सादरीकरण अभियानात झाले. राज्यात अशी संकल्पना प्रथमच सादर झाली होती. शासनाने त्याचे विशेष कौतुक केले.