लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी निरंजन आवटी यांचा निवड झाल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सभापतिपदाची निवडणूक जिंकून भाजपने विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला. आता तीनही शहरांचा समतोल विकास करा, अशी सूचनाही त्यांनी केली.
नूतन सभापती आवटी यांनी कोल्हापूर येथे प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतली. या वेळी भाजपचे नेते सुरेश आवटी, माजी सभापती संदीप आवटी हेही उपस्थित होते. महापौर, उपमहापौर निवडणुकीतील पराभवानंतर स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत विजय प्राप्त करायचाच, असा निर्धार भाजपने केला होता. स्थायी समिती सभापती निवडणूक भाजपसाठी राजकीय प्रतिष्ठेचा बनली होती. अखेर या निवडणुकीत भाजपचा विजय झाला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्थायी समितीच्या माध्यमातून सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांचा विकास करा. सर्वांना बरोबर घेऊन काम करा. प्रशासनाचे सहकार्य घ्या. विविध विकास योजना प्रभावी आणि पारदर्शी राबवा. या वेळी महेश पाटील, शमाकांत आवटी, सुनील मोतुगडे, नितीन आवटी, फयाज उगारे उपस्थित होते.