सांगली : देशात जेथे निवडणुका झाल्या आहेत, तेथे कोरोनाचा प्रसार झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत कोरोना संपत नाही, तोपर्यंत देशातील कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असून त्याच्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याची टीकाही त्यांनी केली.
शेट्टी म्हणाले, कोरोनात वाढ असताना पाच राज्यांत निवडणुका घेण्यात आल्या. राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली. सभा, रॅली आणि बैठकांमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने झाला. परिस्थिती बिकट होत असतानाही निवडणुका घेणे योग्य नाही. जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत देशात कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत.
रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरू आहे. रुग्णांसाठी प्रभावी असणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
चौकट
होम आयसोलेशन रुग्णांवर लक्ष ठेवा
कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले जात आहे. मात्र, बहुतांशी रुग्ण बाहेर फिरत आहेत. याकडे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.