लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना, म्युकरमायकोसिसनंतर आता कानांनाही बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कानांच्या तक्रारीत वाढ होते. बुरशीजन्य संसर्गामुळे कान दुखत असतो. पण अनेकजण त्यावर घरीच उपचार करतात, अथवा त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भविष्यात कानाचा पडदा, पाठीमागील हाडामध्ये दोष निर्माण होण्याची भीती असते. त्यासाठी तज्ज्ञ डाॅक्टरांकडून वेळीच औषधोपचार घ्यावेत, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टर देतात.
आजही कानदुखीसारख्या रोगांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. कानात पाणी जाणे, वेळीच कान कोरडे न करणे, अशा कारणांनी कानात बुरशी होण्याचा धोका अधिक असतो. विशेषत: पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्ग अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात कानांची विशेष काळजी घेतली पाहिजे. घरातील चुकीच्या उपचारांमुळे बुरशीची वाढ झपाट्याने होऊन समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यासाठी वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
कोट
पावसाळा, दमट वातावरणात कानात बुरशी होण्याचे प्रमाण वाढते. दरवर्षी अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. अनेकजण घरीच उपचार करतात. काहीजण कानात तेल घालतात, तर काहीजण डाॅक्टरांकडून ड्राॅप घेतात. पण ते धोकादायक आहे. तज्ज्ञ डाॅक्टरांकडून औषधोपचार करून घेतले पाहिजे, अन्यथा हा धोका वाढून पडद्याला दोष निर्माण होऊ शकतो. - डाॅ. शशिकांत दोरकर
कोट
दमट वातावरणात कानात बुरशी तयार होते. पावसाळ्यात ती दुपटीने वाढते. कानाचा आकार वेडावाकडा असेल तर कानातील पाणी बाहेर येत नाही. तसेच मधुमेही रुग्णांना त्याचा धोका अधिक असतो. दोन ते तीन वेळा तज्ज्ञ डाॅक्टरांकडून उपचार घेतल्यास हा रोग बरा होतो. - डाॅ. सुरेश नाईक
चौकट
काय घ्याल काळजी
१. कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावेत. विशेषत: आंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करावेत. हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जूंतक करावा.
२. टोकदार वस्तूने कान स्वच्छ करू नये, कान दुखू लागल्यास किंवा कानातून पाणी येत असल्यास डाॅक्टरांना भेटावे. कानात तेल अथवा ड्राॅप घालू नये. वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
चौकट
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
१. बुरशीजन्य कानात होणारे संक्रमण मुख्यत: कान कालवावर परिणाम करते. दूषित पाण्यात पोहणे, कानाला आघात होणे, पावसाळ्यात कानात पाणी जाणे, अशा कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. दमट वातावरणातही बुरशीचा धोका अधिक असतो.
२. खेड्यापाड्यात आजही कान दुखू लागल्यास कानात तेल घातले जाते. ते चुकीचे आहे. मुळात ओलाव्यामुळे बुरशीत वाढ होते. तेल घातल्याने संसर्ग वाढण्याचा धोका असतो. बुरशी वाढत जाऊन कानात पुरळ, गाठी होऊ शकतात. कानामागील हाड, पडद्यालाही दोष निर्माण होऊ शकतो.