मिरज : महापालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळांत शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी महिला बचत गटांना देण्यात येणारे बिल तब्बल आठ महिने मिळालेले नाही. शाळेत दररोज विद्यार्थ्यांना पोषण आहार तयार करणाऱ्या बचत गटांची लाखो रुपयांची बिले थकित आहेत. शिक्षण मंडळाकडून बिले मिळत नसल्याने बचत गट अर्थिक अडचणीत आले आहेत. खासगी आणि महापालिकेच्या प्राथमिक शाळांत पोषण आहार दररोज दिला जातो. शाळांना पोषण आहार शिजवून देण्याकरिता महिला बचत गटांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली आठ महिने पंचायत समिती व शिक्षण मंडळाकडे बिले पडून आहेत. महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांतील ही रक्कम कोटी रुपयांच्या घरात आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे १०० खासगी व महापालिकेच्या प्राथमिक शाळांत आहार शिजवून दिला जातो. त्यासाठी बचत गटांची बिले मिळत नसल्यामुळे बचत गट अडचणीत आहेत. शिक्षण मंडळाकडून बिलेच मिळत नसल्याने बचत गटांचा संस्था चालकांकडे तगादा सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यानंतर शिक्षण मंडळापर्यंत बिले मंजूर होऊन त्याच्या रकमा मिळतात. बिले रखडल्याने दररोजचा खर्च पेलणे आता आवाक्याबाहेर झाले आहे. अशावेळी काही संस्थाचालकांनी पदरमोड करून योजना सुरू ठेवली आहे. काही ठिकाणी बचतगटांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली आहे. (वार्ताहर)
पोषण आहाराची बिले आठ महिने थकित!
By admin | Published: October 30, 2015 11:48 PM