डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील तलावात सोडलेल्या पाण्याची लूट सुरू आहे, कालवा फोडला जात आहे. ‘लोकमत’मधून यासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी आ. विलासराव जगताप यांनी डफळापूर येथे बैठक घेऊन यासंदर्भात म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. पाणीचोरी होऊ नये यासाठी अधिकाराचा पूर्ण वापर करा, अशी सूचना त्यांनी दिली.
आ. जगताप म्हणाले, ग्रामस्थांनी व शेतकºयांनी पाणी जपून वापरले पाहिजे, अन्यथा भविष्यात सर्वांनाच भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. शेतकºयांनी सरसकट पिकांना ठिबकने पाणी द्यावे, कमी पाण्याची पिके घ्यावीत, म्हैसाळच्या अधिकाºयांनी पाणी वाटप करताना सर्व शेतकºयांना समान न्याय द्यावा.
यावेळी म्हैसाळ योजनेचे कनिष्ठ अभियंता एम. बी. कर्नाळे यांनी, आ. जगताप यांनी केलेल्या सूचनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.तब्बल एक महिना झाला, डफळापुरात नळाला पाणी आलेले नाही. त्यामुळे आता तलावात पाणी आल्याने ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीने सोमवारपासून तलावातून मोटरद्वारे उपसा सुरु केला. जळालेली मोटर दुरुस्त करुन ग्रामपंचायतीच्या कर्मचाºयांनी तलावात मोटर जोडली व पाणी सुरु केले.
डफळापूर तलावात सोडण्यात आलेले पाणी हे केवळ पिण्यासाठी वापर केला, तर डफळापूर ग्रामस्थांना जूनअखेर पाणी पुरेल, असा दावा म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी केला आहे. परंतु पैसे भरले असल्याने शेतकºयांनाही पाण्याची आस लागून राहिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही पाणी उचलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दुहेरी अडचणीत आता प्रशासनाला मार्ग काढून पाण्याचे वाटप करून ते पुरवावे लागणार आहे.यावेळी परसराम चव्हाण, विलास माने, माधवराव चव्हाण, बाजीराव चव्हाण, राहुल पाटील, डॉ. साहेबराव गावडे, अरुण छत्रे, प्रमोद चव्हाण, दिलीप माळी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
‘लोकमत’चे कौतुककालवा फुटीबाबत बातमी प्रसिद्ध केल्याने आ. विलासराव जगताप यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले. तसेच वृत्तपत्रात बातमी येऊनही तालुक्यातील योजनेच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसते, याबाबत त्यांनी खंत व्यक्त करत, अधिकाऱ्यांना जागरूक राहून काम करण्याची सूचना केली.