हरिपूर : सांगलीत सुरू असलेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत तगड्या दिल्ली व चंदीगड संघांचा धुव्वा उडवत यजमान महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक दिली. आज, १६ डिसेंबररोजी अंतिम सामना होणार आहे. सांगलीत सुरू असलेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेचा शुक्रवारचा दिवस महाराष्ट्राच्या मुले व मुली या दोन्ही संघांनी गाजविला.
मुलांमध्ये महाराष्ट्र विरूध्द दिल्ली असा उपांत्य सामना झाला. महाराष्ट्राचा अव्वल खेळाडू प्रथमेश माने व हर्ष तांबोळी (दोघे सातारा), अनिकेत घाटे (सोलापूर) यांनी दमदार खेळ करत प्रतिस्पर्धी संघ खिळखिळा केला.महाराष्ट्राच्या संघाने दिल्लीला जेरीस आणत १७-७ अशा दहा गुणांच्या फरकाने विजय मिळवला. मुलींमध्ये उपांत्य सामना महाराष्ट्र विरूध्द चंदीगड असा झाला. महाराष्ट्राच्या रणरागिणींनी चंदीगडला चारीमुंड्या चित करत १४-० असा एकतर्फी विजय मिळवला. साक्षी लिगाडे (सातारा) व क्रांती निम्हण (पुणे) यांनी नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन केले.दि. १६ रोजी महाराष्ट्र विरूध्द चंदीगड असा मुलांचा, तर महाराष्ट्र विरूध्द सीबीएससी असा मुलींचा अंतिम सामना होणार आहे. सांगली जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष गौरव नायकवडी, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, डॉ. अमीर शेख, डॉ. प्रमोद बागवडे, अश्विनी दुकानदार यांच्याहस्ते पारितोषिक वितरण होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांनी सांगितले.शुक्रवारचा अंतिम निकालमुले : दिल्ली विजयी विरुध्द पंजाब (११-९), महाराष्ट्र वि. वि. गुजरात (१८-४), चंदीगड वि. वि. आंध्रप्रदेश (६-२), सीबीएससी वि. वि. मध्य प्रदेश (१४-१२).मुली : चंदीगड वि. वि. दिल्ली (१२-७), महाराष्ट्र वि. वि. मध्यप्रदेश (१५-०), सीबीएससी वि. वि. तेलंगणा (३०-८), छत्तीसगड वि. वि. हरियाणा (११-७).