मोबाइलवर एखादा गेम डाऊनलोड केल्यानंतर अन्य शेकडो ऑनलाइन गेमच्या जाहिराती येत राहतात. गेमिंग कंपन्यांकडून जाहिरातींचा मारा होतो. त्यामुळे मुले ऑनलाइन गेम्सच्या प्रेमात पडतात. दररोज नवनवे गेम्स डाऊनलोड करून घेणारी मुले पालकांचा बॅंक बॅलन्स कमी करताहेत.
इंटरनेटवर तीनपत्ती, रमीपासून ते कॅसिनो गेमपर्यंत हजारो गेम्सच्या साइट्स आहेत. क्रिकेट, रेसिंग, फायटिंग, फायरिंग असे हजारो गेम आहेत. त्यापैकी ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे लागतात. असे गेम डाऊनलोड केल्यानंतर ते थेट तुमच्या बँक अकाऊंटला जोडले जाते. या जुगाराच्या नादात अनेकांची बँक खाती रिकामी झाली आहेत. पालकांना मेसेज गेल्यानंतरच मुलांचे पराक्रम लक्षात येतात. ऑनलाइन मुलांना जुगाराने आपल्या जाळ्यात अडकविले आहे. त्यामुळे पालकांनीच सजग होऊन मुले मोबाइलचा वापर कशासाठी करीत आहेत, यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. अन्यथा खिशाला कात्री लागल्यानंतर पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नाही.
चौकट
काही महिन्यांपूर्वी सांगलीतील एका पालकाच्या खात्यातून पैसे गेले. त्याने पोलिसांत तक्रार केली. तपासाअंती त्यांच्या चिरंजीवाने ऑनलाइन गेममध्ये हजारो रुपये घालविल्याचे समोर आले होते. अशी कित्येक उदाहरणे घडली आहेत. त्यात कंपन्यांकडून वित्तीय जोखमीचा इशारा दिला जातो. त्याकडे काणाडोळा करून अनेक जण दिवस दिवस गेम खेळण्यासाठी वेळ घालवितात.
- शीतल पाटील