कडेगाव : कडेगाव तालुक्यात मंगळवारी १८ ते ४४ वयोगटातील लोकांना राज्य सरकार करून पुरवठा झालेली कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. ऑनलाईन नोंदणी करून कडेगाव आणि चिंचणी ग्रामीण रुग्णालयांमध्ये लस घेतलेल्यांमध्ये बहुतांश तालुक्याबाहेरचे सुशिक्षित व उच्चशिक्षित लोक आहेत. त्यामुळे स्थानिक व सर्वसामान्य कुटुंबांतील लोकांना लस मिळणे कठीण होत आहे.
तालुक्यातील काही लोक ऑनलाईन सेवा उपलब्ध असेल त्या ठिकाणी लस घेत आहेत. त्यामुळे आपल्या गावामध्ये कोणी लस घेतली आणि कोणी घेतलेली नाही, याची माहिती मिळविणे ग्रामपंचायत आणि आशा स्वयंसेविकांना कठीण होत आहे. कडेगाव ग्रामीण रुग्णालय येथील लसीकरण केंद्र महात्मा गांधी विद्यालय, कडेगाव येथे हलविले आहे. त्या ठिकाणी २०० आणि चिंचणी ग्रामीण रुग्णालयात २०० लोकांचे लसीकरण करण्यात आले. ऑनलाईन नोंदणी करून आलेल्या लोकांनाच लस देण्यात येत होती. याशिवाय दोन तासांचा टाईम स्लॉटही केला असल्याने लसीकरण शांततेच्या वातावरणात झाले.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये मंगळवारी बहुतांश ठिकाणी लसीकरण बंद होते. या ठिकाणी केंद्र सरकारकडून पुरवठा होत
असलेल्या कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या अनेक लोकांना लस उपलब्ध नसल्यामुळे लस न घेता घरी परतावे लागले.
चौकट
त्यांना लसीकरण कधी?
कोणत्याही क्षणी केवळ चार मिनिटांच्या कालावधीत संबंधित ग्रामीण रुग्णालयामध्ये दिल्या जाणाऱ्या लसीसाठी २०० लोकांच्या नोंदी होत आहेत. त्यामुळे जो २४ तास सावध आहे व तंत्रज्ञानात पारंगत आहे आणि ज्यांच्या घरी मोबाईल इंटरनेटसाठी चांगली रेंज आहे, तेच लोक नोंदणी करण्यात यशस्वी होत आहेत.