सांगली : जिल्ह्यात कोरोनाचे अवघे १० हजार डोस शिल्लक आहेत. मागणी इतक्या डोसचा पुरवठा होत नसल्याने जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. बुधवारी (दि. ७) दिवसभर लसीकरणासाठी डोस पुरतील की नाही याची चिंता लागून राहिली आहे.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाने वेग घेतला असून दररोज सरासरी १५ हजारांहून अधिक लसीकरण होत आहे. मंगळवारी एका दिवसात १८ हजार १२१ जणांनी लस घेतली. ४५ वर्षांवरील सर्वांसाठी लस देण्यात येत असल्याने लसीकरणासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे लसीचा वापर वाढला आहे. जिल्हा परिषदेत लस साठवणूक केंद्रात मोठ्या प्रमाणात साठा होता, मागणी वाढल्याने तो संपुष्टात आला आहे. आजवर अडीच लाखांहून अधिक डोस जिल्ह्याला प्राप्त झाले होते. एकूण लसीकरण २ लाख ४४ हजार ८८६ इतके झाले. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सची दुसऱ्या डोसची फेरी सध्या सुरु आहे.
वाढते लसीकरण पाहता आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यात शासनाकडे दोन लाख डोसची मागणी केली होती, प्रत्यक्षात फक्त ५० हजारच प्राप्त झाले. ते देखील दोन-तीन दिवसांतच संपत आले. सध्या फक्त १० हजार डोस शिल्लक आहेत. त्यातून बुधवारचे लसीकरण कसे पूर्ण करायचे याची चिंता लागून राहिली आहे. सध्या दररोज सरासरी १७ हजार लाभार्थ्यांना लस टोचली जाते. त्यामुळे बुधवारी सकाळपर्यंत लसीचा पुरेसा पुरवठा झाला नाही तर दुपारनंतर पाच हजारांहून अधिक नागरिकांना लस न घेताच परतावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरेशा लसीचा तातडीने पुरवठा व्हावा यासाठी आरोग्य यंत्रणेचा दिवसभर पाठपुरावा सुरु होता.
चौकट
असा आहे लसीकरणाचा वेग
मंगळवारचे एकूण लसीकरण - १८ हजार १२१
मंगळवारी ४५ वर्षांवरील लाभार्थी - ९ हजार ८८०
आजवरचे एकूण लसीकरण - २ लाख ४४ हजार ८८६