सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बिघडलेली घडी सुरळीत करण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे रोजीरोटीची अडचण आलेल्या घटकांना आर्थिक मदतीबरोबरच मोफत धान्यही देण्यात येत आहे. आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने या घटकाला दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आले होते. यंदाही कोरोनामुळे अर्थकारण पूर्ण थांबल्याने अनेक घटक अडचणीत आहेत. सध्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत व राज्य शासनाकडूनही पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देण्यात येत आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता जूनमध्ये अन्नधान्य वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या गोरगरीब घटकाला मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढतच चालल्याने केशरी कार्डधारकांनाही सवलत मिळण्याची मागणी होत होती. त्यामुळे आता शासनाने जून महिन्यात प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार आहे. सवलतीच्या दराबाबत मात्र, शासकीय पातळीवर अद्याप निर्णय झाला नाही, त्यामुळे याबाबत निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्षात धान्यवाटप सुरू होणार आहे.
चौकट
जिल्ह्यातील दोन लाख कार्डधारकांना लाभ
जिल्ह्यातील केशरी कार्डधारकांची दोन लाख १८ हजार संख्या आहे, तर दहा लाख ३८ हजार लोकसंख्या लाभार्थी आहे. शासनाच्या या निर्णयाचा प्राधान्य कुटुंब, अंत्योदय लाभार्थींना लाभ मिळतच आहे, आता केशरी शिधापत्रिकांनाही लाभ मिळणार आहे.
चौकट
बीपीएलच्या ६४९२८ कुटुंबांना लाभ
१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासून प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेत लाभ मिळत आहे.
२) प्राधान्य कुटुंब योजनेत शेतकरी कार्डधारकांना सलवत नव्हती. शासनाच्या या निर्णयामुळे आता लाभ मिळणार आहे.
३) जिल्ह्यातील अंत्योदय लाभार्थींना लाभ मिळत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या नियोजनाचा लाभ मिळत आहे.
चौकट
आदेश प्राप्त होताच अंमलबजावणी
कोरोना कालावधीत समाजातील या गरजू घटकाला त्वरित लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही त्यासाठी नियोजन केले आहे. केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरातील धान्याबाबत शासन आदेश अद्याप प्राप्त झाला नसून, तो आल्यानंतर त्वरित निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
जिल्ह्यातील एकूण कार्डसंख्या
४०५८७३
प्राधान्य कुटुंब ३७४५०८
बीपीएल ६४९२८
अंत्योदय ३१३६५