बोरगावला पूरबाधित कुटुंबांचे पंचनामे करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:28 AM2021-07-28T04:28:31+5:302021-07-28T04:28:31+5:30
बोरगाव : पूरस्थितीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित चौधरी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी ...
बोरगाव : पूरस्थितीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित चौधरी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिले.
बोरगाव (ता. वाळवा) येथील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. चौधरी यांनी व्यापारी व शेतीचे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. जनावरांच्या लसीकरणाची मोहीम राबविण्याची सूचना दिली. पूरग्रस्त नागरिकांवर अन्याय होऊ नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. गावात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवून औषध फवारणी, मेडिक्लोअर वाटप करावे. कुपनलिकामध्ये टीसीएल पावडर व मेडिक्लोअर टाकावे, असेही ते म्हणाले.
यावेळी ग्रामस्थांनी पूरकाळात आलेल्या समस्या मांडल्या. प्रांताधिकारी देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, उपसरपंच शकील मुल्ला, प्रमोद शिंदे, सूर्यकांत पाटील, माणिक पाटील, कार्तिक पाटील, देवराज देशमुख, ग्रामविकास अधिकारी बादशहा नदाफ, तलाठी प्रकाश पाटील उपस्थित होते.
चौकट :
पशुवैद्यकीय अधिकारीच नाही
जनावरांच्या लसीकरणाबाबत चर्चा सुरू असताना गेल्या तीन वर्षांपासून गावाला पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याची बाब ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, तर बैठकीला आरोग्य अधिकारीच उपस्थित नसल्याने जिल्हाधिकारीही थक्क झाले.