वड्डी येथील बंधाऱ्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:50+5:302021-06-25T04:19:50+5:30
वड्डी (ता. मिरज ) येथील ओढ्यावरील बंधाऱ्याची अशी दुरवस्था झाली आहे. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वड्डी (ता. मिरज ...
वड्डी (ता. मिरज ) येथील ओढ्यावरील बंधाऱ्याची अशी दुरवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वड्डी (ता. मिरज ) येथील बंधाऱ्याच्या गुणवत्तेविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी कृषी विभागाला दिले आहेत. दर्जाविषयी सदस्यांच्या तक्रारी असल्याने वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा असे पत्रात म्हटले आहे.
वड्डी येथे कृषी विभागामार्फत २०१२-१३ मध्ये बंधारा बांधण्यात आला होता. जलसंधारण योजनेतून निधी खर्च करण्यात आला होता. त्याच्या दर्जाविषयी जलसंधारण समितीच्या सदस्यांनी आक्षेप घेतले आहेत. अवघ्या सात-आठ वर्षांत बंधाऱ्याची दुर्दशा झाली आहे. सिमेंट, वाळू आदींचा प्रामाणिक वापर न केल्याने मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पाण्याचा साठा न झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होत नाही, तर बंधाऱ्याखालील शेतीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होते अशी सदस्यांची तक्रार आहे. त्यामुळे बंधारा बांधकामाची सखोल चौकशी करण्याची मागणी समितीच्या सभेत झाली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांच्याकडून सुस्पष्ट अहवाल मागितला होता.
जलसंधारण समितीची पुढील सभा सोमवारी (दि. २८) होणार आहे, तरीही कृषी विभागाने अद्याप अहवाल दिलेला नाही. याची दखल घेत गुडेवार यांनी मास्तोळी यांना स्मरणपत्र पाठवले आहे. सोमवारच्या सभेत बंधाऱ्याचा विषय चर्चेला येऊ शकतो, त्यामुळे अहवाल समक्ष सादर करावा, असे पत्रात म्हटले आहे.