अनाथ कार्तिकीला अखेर मिळाला नाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:21 AM2020-12-26T04:21:30+5:302020-12-26T04:21:30+5:30
पंढरपुरात मृत आईसोबत सापडलेल्या आठ महिन्यांच्या बालिकेस पोलिसांनी शिशुगृहात दाखल केले. रेणुका शिशुगृहातून सांगलीतील भगिनी निवेदिता प्रतिष्ठान येथे ...
पंढरपुरात मृत आईसोबत सापडलेल्या आठ महिन्यांच्या बालिकेस पोलिसांनी शिशुगृहात दाखल केले. रेणुका शिशुगृहातून सांगलीतील भगिनी निवेदिता प्रतिष्ठान येथे आलेल्या कार्तिकीस १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तेथून बाहेर पडावे लागले. यामुळे पुन्हा बेघर झालेल्या कार्तिकीने महिला निवारा केंद्रात व नंतर मिरजेतील बेघर केंद्रात आश्रय घेतला. सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख व सुरेखा शेख यांनी तिचा सांभाळ केला. तेथे परिचारिका प्रशिक्षण घेऊन कार्तिकी सांगलीत खासगी नोकरी करू लागली. बुलढाणा येथील अजय या तरुणाने तिच्याशी विवाहाची तयारी दर्शविल्याने अनाथ कार्तिकी शुक्रवारी विवाहबंधनात अडकली. मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे डॉ. विनोद परमशेट्टी, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, सुरेखा शेख यांच्या पुढाकाराने कार्तिकी व अजयचा सत्यशोधक पद्धतीने विवाह पार पडला. अजय हा मुंबईत खासगी रुग्णालयात काम करतो.
न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना, आस्था बेघर केंद्र व परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टने विवाहासाठी सर्व मदत केली. नवदापत्यास प्रापंचिक साहित्य भेट देण्यात आले.
यावेळी डॉ. विनोद परमशेट्टी, उपायुक्त स्मृती पाटील, शाहीन शेख, सुरेखा शेख, डॉ. विकास पाटील, डॉ. सूर्यकांत व्हावळ, डॉ. रणजित चिडगुपकर, मिलिंद अग्रवाल, मुख्याध्यापक पी. एन. चव्हाण, अतीश अग्रवाल, मंदार वसगडेकर, विशाल लिपाणे, प्रभात हेटकाळे, सतीश माने, रमेश पाटील, बाबासाहेब आळतेकर, मिलिंद सलगर, अण्णाप्पा कोरे, अंकुश कोळेकर, संदीप पितलिया, अजित पोतदार, शिवराज पवार, सुहास कोष्टी, संजय कानडे, प्रकाश भंडारे यांच्यासह शहरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
फाेटाे : २६ मिरज १..२