रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरी पाली उभी धोंड येथे माझी जमीन आहे. त्यामध्ये प्रस्तावित रस्ता रूंदीकरणामध्ये माझ्या एकाच बाजूने जास्त भूसंपादन होणार आहे. यात माझी शेतजमीन, विहीर, बागायती उद्ध्वस्त होणार आहे. मात्र, पलिकडील ओसाड कातळाची जमीन जराही संपादित न करता ती सुरक्षित ठेवण्यात आली आहे. हा कोणता न्याय? ही व्यथा मांडली आहे पाली येथील सुमंत पालकर यांनी! या रस्ता रुंदीकरणामध्ये त्या शेतकऱ्याची तीन एकर भूखंडाची पट्टी विहिरीसह जाणार आहे. त्यामुळे आमच्या रोजीरोटीचे पूर्ण साधनच संपणार आहे. त्यामुळे पाली येथे केवळ पर्यायी बाह्य वळण मार्गाचा अवलंब करावा, अन्यथा आम्हाला सनदशीर मार्गाने लढा उभारावा लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, पालीच्या वतीने देण्यात आला आहे.मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाबाबत हरकती नोंदवण्यात आल्या. त्यावेळी पाली बाजारपेठ, संघर्ष समिती, ग्रामस्थ, व्यापारी, शेतकरी यांनी पोटतिडकीने आपली बाजू वैयक्तिकपणे प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांच्यासमोर नोंदवली. यावेळी अगदी ८० वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिक, अपंग स्त्रिया उपस्थित होत्या. पालीमध्ये सर्वाधिक नुकसान होऊन बाजारपेठ नामशेष होणार असल्याने जून महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पाचा आढावा घेताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यायी बाह्य मार्गाला मंजूरी दिली आहे. तरीही सध्या येथूनच भूसंपादनाची प्रक्रिया सुरु असल्याने प्रकल्पग्रस्त संभ्रमावस्थेत सापडले आहेत. त्यामुळे पाली गावातून सर्वाधिक हरकती नोंदवल्या गेल्या.हरकत नोंदवल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी येथील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक सुमंत पालकर यांनी सांगितले की, माझ्या जमिनीचे प्रस्तावित चौपदरीकरणासाठी भूसंपादन होणार असेल, तर त्यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये मला सुचित करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रकृ ती साथ देत नसतानाही आज मी हजर राहून सुनावणीमध्ये ठामपणे हरकत घेतली आहे. यामध्ये माझे राहाते घर, जमीन यांचे नुकसान होणार आहे. अशीच घटना पालीतील विनोद पालकर यांच्यासंदर्भात झाली आहे. त्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयाने भूसंपादनाच्या बाबतीत सुचित केलेली नाही. तसेच रवींद्र सुर्वे म्हणाले की, माझ्या जमिनीचे संपादन होणार असल्याने त्यातील विहीर, बागायती, जमीन अशी तीन एकरापर्यंतची जागा बाधित होणार आहे. याउलट रस्त्याच्या दोन्ही बाजूने समान संपादन येथेही झालेली नाही. यावेळी सुनावणीमध्ये हरकत नोंदवताना संघर्ष समिती अध्यक्ष प्रभाकर राऊत, जयप्रकाश पाखरे, विश्वास सावंत, शंकर राऊत, सिद्धराज सावंत, अनंत हिरवे, नामदेव लिंगायत, अजित साळवी, मनोहर काटकर, शरद राऊत, प्रसन्न पाखरे, सदानंद राऊत यांनी पर्यायी मार्गांसाठी हरकती नोंदविल्या. (प्रतिनिधी)आमचा रस्ता रूंदीकरणाला विरोध नाही. आम्ही पालीवासीयांनी यासंदर्भातील पूर्वीच्या प्रक्रियांना सहाय्य केले आहे. परंतु पाली बाजारपेठेची भौगोलिक स्थिती पाहता येथून होणारे रुंदीकरण लोकांना उद्ध्वस्त करणारे आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करून येथील शेतकरी, व्यावसायिकांना वाचवावे, ही आमची मागणी नोंदविली आहे.- प्रभाकर राऊत, अध्यक्ष, प्रकल्प संघर्ष समिती, पाली
...अन्यथा सनदशीर मार्गाने लढा उभारू
By admin | Published: December 14, 2015 11:52 PM