ऑक्सिजन मिळाला अन त्या ३५ रुग्णांचा जीव भांड्यात पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 05:43 PM2021-05-04T17:43:21+5:302021-05-04T17:44:24+5:30
CoronaVirus Sangli : कुपवाड येथील एका खासगी कोव्हीड रुग्णालयात केवळ एक तासच पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा शिल्लक होता. वेळेत ऑक्सिजन उपलब्ध होईल याची खात्री डॉक्टरांना नव्हती. अशा स्थितीत प्रसंगाचे गांभीर्य ओळखत नगरसेवक अभिजित भोसले यांनी थेट औद्योगिक वसाहत येथील ऑक्सिजन प्लांट मध्ये धाव घेत तात्काळ त्या रुग्णायलाला ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. त्यामुळे जीवाची घालमेल सुरू असलेल्या त्या ३५ रुग्णांचा जीव भांड्यात पडला.
सांगली : कुपवाड येथील एका खासगी कोव्हीड रुग्णालयात केवळ एक तासच पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा शिल्लक होता. वेळेत ऑक्सिजन उपलब्ध होईल याची खात्री डॉक्टरांना नव्हती. रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना सांगितलं होते, त्यानुसार सर्वांनीच तयारी सुरू केलेली होती. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांच्या जीवाची घालमेल सुरू होती. अशा स्थितीत प्रसंगाचे गांभीर्य ओळखत नगरसेवक अभिजित भोसले यांनी थेट औद्योगिक वसाहत येथील ऑक्सिजन प्लांट मध्ये धाव घेत तात्काळ त्या रुग्णायलाला ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. त्यामुळे जीवाची घालमेल सुरू असलेल्या त्या ३५ रुग्णांचा जीव भांड्यात पडला.
कुपवाड येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये कोव्हीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. रुग्ण संख्या वाढत असताना ऑक्सिजनचा प्रचंड तुडवडा जाणवत आहे. मागणी पेक्षा अत्यंत कमी प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. दरम्यान सोमवारी रात्री ऑक्सिजनचा उपलब्ध साठा संपत असल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णालयात खळबळ माजली.
रुग्णांसह नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला. ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होत नसल्याचे लक्षात येताच रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांनी नातेवाईकांना केल्या. यामुळे गोंधळ सुरू झाला. रुग्णांना अन्य रुग्णालयात शिफ्ट करण्यासाठी रुग्णवाहिकाही मागविण्यात आल्या.
स्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच काही रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट नगरसेवक अभिजित भोसले यांच्याशी संपर्क साधला. भोसले यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत सामाजिक कार्यकर्ते धनंजय वाघ, रवी खराडे, जयंत जाधव याना सोबत घेत ते रुग्णालय गाठले. नातेवाईक, डॉक्टरांशी चर्चा केली. ऑक्सिजन मिळवून देण्याची ग्वाही दिली.
येथील औद्योगिक वसाहत येथे असणाऱ्या ऑक्सिजन प्लांटकडे धाव घेतली. तेथील शासकीय अधिकाऱ्यांना रुग्णालयात उदभवलेली परिस्थिती समजावून सांगितली. संबंधित हॉस्पिटलला प्राधान्याने ऑक्सिजन देण्याची विनंती केली. संवेदनशील अधिकाऱ्यांनी तात्काळ ऑक्सिजन चे दोन ड्युरा सिलेंडरसह २५ जम्बो सिलेंडर संबंधित रुग्णालयाकडे रवाना केले.
ऑक्सिजन रुग्णायलात आल्यानंतर रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. नगरसेवक भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने हालचाल केली. त्यामुळे त्या हॉस्पिटल मधील ३५ रुग्णांना दिलासा मिळाला. याबाबत नगरसेवक भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ऑक्सिजन बाबत अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन आले.
याबाबत तात्काळ राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याशी चर्चा केली. त्यांनी रुग्णालयात तसेच ऑक्सिजन प्लांटवर जाऊन रुग्णांना मदत करण्याच्या सूचना केल्या. राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना त्याबाबत सत्वर आदेशीत केले.त्यानुसार संबंधित हॉस्पिटलला नगरसेवक अभिजीत भोसले आणि सहकार्यांनी तात्काळ ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, ह्या सर्व टीमचे रुग्णालय प्रशासन, रुग्णाचे नातेवाईक, कुपवाडकर नागरिक आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी आभार मानले.