पलूस : पलूस येथील शिवभोजन केंद्र कोरोना काळात हातावर पोट असलेले नागरिक, शेकडो परप्रांतीय मजुरांचा आधार ठरत आहे. दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त लोकांच्या भुकेचा प्रश्न मिटवून संजय व मनिषा पाटील हे दाम्पत्य अनाेखी समाजसेवा करत आहे.
गेल्या वर्षी शासनाने शिवभोजनाची संकल्पना मांडली आणि ती सत्यात उतरविली. पलूससारख्या ठिकाणी एमआयडीसीतील कामगार, बांधकाम मजूर, फिरस्ते, खेळ करणारे, असे अनेक लोक, तसेच मोलमजुरीसाठी आलेल्या परप्रांतीयांची संख्या माेठी आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या हाताला काम नाही. जे काम आहे, त्यातून तुटपुंजी रक्कम हातात मिळते. अशांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती, पण या शिवभोजन केंद्रामुळे त्यांना माेठा आधार मिळाला आहे.
हे केंद्र येथील संजय पाटील आणि मनीषा पाटील हे दाम्पत्य चालवतात. गेल्या कोरोनाच्या काळात संजय पाटील यांनी शासनाच्या मर्यादेपेक्षा जास्त जेवणाची पाकिटे गरजू कुटुंबांना त्यांच्या खोपटावर जाऊन पोहोच केली. त्यांनी काेराेनाच्या पहिल्या लाटेवेळी शिवभोजनाच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामाचे कौतुक तहसीलदार निवास ढाणे यांनी केले हाेते. जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनीही त्यांच्या सामाजिक कार्याचे काैतुक केले.