सांगली: कोविड-19 आजारातून बरे झालेल्या ज्या रूग्णांना श्वसनाचे अथवा स्नायूचे त्रास आहेत अशा रूग्णांना फुफुसांची ताकद वाढवण्यासाठी तसेच शरीराची हालचाल अतिशय सुलभरित्या होण्यासाठी फिजिओथेरपी अतिशय उपयुक्त आहे. यासाठी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे डी.ई.आय.सी. विभागात पोस्ट कोविड फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचा जिल्ह्यातील गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.जिल्हा प्रशासन, फिजीओथेरपी असोसिएशन सांगली व कॉलेज ऑफ फिजीओथेरपी वालनेस हॉस्पीटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे सुरू करण्यात आलेल्या पोस्ट कोविड फिजिओथेरपी सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, डीईआयसी मॅनेंजर कविता पाटील, फिजीओथेरपिस्ट प्रणव देशमुख, एनटीसीपी समन्वयक डॉ. मुजाहिद अलास्कर आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, कोरोनातून मुक्त झालेल्या ज्या रूग्णांना श्वसनाचे अथवा स्नायुचे त्रास आहेत त्यांना पोस्ट कोविड फिजिओथेरपी सेंटरमध्ये तज्ज्ञ फिजीओथेरपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम शिकविले जातील. तसेच व्यायामाच्या विविध प्रकारचे व्हीडिओ दाखविण्याबरोबरच प्रात्यक्षिके करून घेतली जातील.
आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत पोस्ट कोविड फिजिओथेरपी सेंटर सुरू राहणार आहे. आवश्यकतेनुसार पुढे आणखी दिवसही वाढविण्यात येतील. जिल्ह्यात आत्तापर्यंत 35 हजाराहून अधिक रूग्ण कोविड आजारातून बरे झाले आहेत.
कोरानामुक्त रूग्णांनी पुढील त्रास / दुषपरिणाम टाळण्यासाठी फिजिओथेरपी सेंटरचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी फिजिओथेरपी सेंटरच्या 0233-2950011 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी डॉ. सचिन शेट्टी, डॉ. रोनाल्ड प्रभाकर, डॉ. स्नेहा कटके, डॉ. अनिकेत लिमये, डॉ. अक्षय लिमये, डॉ. निखील पाटील, डॉ. एश्वर्या, डॉ. सुकन्या जाधव, डॉ. प्रज्ञा जोशी आदि उपस्थित होते.