जत : ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने वेळोवेळी पारित केलेल्या निर्णयांची शासकीय कार्यालयातून त्वरित अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी जत तालुका पेन्शनर्स असोसिएशन व ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांना बुधवारी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर २०१९ पासून ११ महिन्यांचा मंजूर केलेला महागाई भत्ता फरक देण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या हप्त्याच्या फरकाबाबत शासनाने फेरविचार करावा व थकबाकीचा दुसरा हप्ता संबंधितांना देण्यात यावा, केंद्र शासनाच्या धोरणानुसार दरमहा एक हजार रुपये वैद्यकीय भत्ता मिळावा, सेवानिवृत्तीबाबत शासन निर्णय व आदेशाची पूर्तता करण्यात यावी, इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्हा परिषदेमधील सेवानिवृत्तांना दरमहा एक ते पाच तारखेच्या दरम्यान निवृत्तीवेतन मिळावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी यशवंतराव चव्हाण, शिवाजीराव भोसले, चंद्रसेन माने-पाटील, श्रीमंत ठोंबरे, रामचंद्र घोडके, मल्लिकार्जुन आरळी, आनंदराव शिंदे, गुरुबाळ तंगडी, गुरुमूर्ती जेऊर आदी उपस्थित होते.