आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महिलांना कोरोना कालावधीत केलेल्या कामाचे प्रोत्साहन अनुदान अदा करावे, असे पत्र कडेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दाजी दाइंगडे यांनी
तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी
व ग्रामसेवकांना दिले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम
करणाऱ्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक,
ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका,
मिनी अंगणवाडी सेविका, अर्धवेळ परिचर
यांना नियमित वेतन आणि मानधना व्यतिरिक्त एक हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम संबंधित ग्रामपंचायतींकडून देण्याचा निर्णय सरकारने मागील वर्षीच घेतला आहे.
मात्र तरीही बहुतांश ग्रामपंचायतींनी हे अनुदान देण्याबाबत टाळाटाळ
करीत आहेत.
सध्या गावोगावी कोरोना
पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहेत. या आपत्कालीन स्थितीत आशा स्वयंसेविका
जबाबदारीने काम करीत आहेत. आशा स्वयंसेविकांकडून संकलित झालेली माहिती गटप्रवर्तक महिलांकडून आरोग्य केंद्र आणि तालुकास्तरावर दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व लसीकरण सर्वेची सर्व कामे
आशा स्वयंसेविका करीत आहेत. तरीही त्यांना प्रोत्साहन अनुदान दरमहा आणि वेळच्या वेळी दिले जात नाही.
गटप्रवर्तकांना मुख्यालयाच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीकडून
प्रोत्साहन अनुदान द्यावे असे आदेश
असतानाही हे अनुदान दिले जात नाही. यामुळे संघटनेने राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना निवेदन दिले होते. यावर दोन्ही नेत्यांनी संबधित अधिकाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या .
चौकट
उपसभापतींची सकारात्मक भूमिका
कडेगाव पंचायत समितीचे उपसभापती आशिष घार्गे यांनी काही आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्यावेळी आशा स्वयंसेविकांनी
ग्रामपंचायतींकडून प्रोत्साहन अनुदान
मिळत नसल्याची तक्रार केली. यावर आशिष घार्गे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन गट विकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली व प्रोत्साहन अनुदानाचा विषय मार्गी
लावला.