लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नाशिक व विरार येथील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सांगली-मिरजेतील सर्वच कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करून २४ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी व आयुक्तांना दिले. दरम्यान, कदम यांनी शहरातील खासगी हॉस्पिटलमधील कोविड सेंटरना भेटी देऊन कोरोना रुग्णांवरील उपचाराची माहिती घेतली.
कृषी राज्यमंत्री डाॅ. कदम हे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर होते. सकाळी त्यांनी महापालिकेत कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यानंतर खासगी रुग्णालयांना भेटी दिल्या. डॉ. आशिष मगदूम यांच्या क्रांती कार्डियाक सेंटरला भेट देऊन तेथील कोविड रुग्णांची माहिती घेतली. त्यानंतर मेहता हॉस्पिटलमध्ये डॉ. अजित मेहता यांच्याशी चर्चा केली. तसेच वाळवेकर हॉस्पिटलमध्ये डॉ. रवींद्र वाळवेकर यांच्याशी संवाद साधला.
राज्यात होणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलची सर्वंकष सुरक्षा चोख ठेवण्याचे आवाहन यावेळी केले. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सोयी-सुविधा व डॉक्टरांना काम करत असताना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. हॉस्पिटलमधील परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांचीही विचारपूस केली. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांना धीरही दिला.
दरम्यान, नाशिक व विरारमधील आगीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांच्या फायर ऑडिटची आवश्यकता समोर आली आहे. त्याबाबत कदम म्हणाले की, या दोन्ही घटना दुर्दैवी आहेत. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. पण अशा घटना टाळल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वच यंत्रणांनी आपल्यातील त्रुटी दूर करून या महामारीच्या मुकाबल्यासाठी सज्ज व्हावे. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही घटनांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सांगली-मिरजेतील रुग्णालयांच्या स्थितीबाबत जिल्हाधिकाऱी व आयुक्तांशी चर्चा केली आहे. त्यांना तातडीने फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या २४ तासात त्याचा अहवालही सादर करण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.