क्रांतिकारकांनी रेल्वे पाडल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण चार जणांनी केली होती कामगिरी फत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:27 PM2018-09-06T23:27:21+5:302018-09-06T23:34:08+5:30
महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता.
शीतल पाटील ।
सांगली : महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता. वसंतदादा पाटील यांनी १४ साथीदारांसह सांगलीचा तुरूंग फोडला. त्यानंतर वर्षभराने म्हणजे ७ सप्टेंबर १९४३ रोजी सांगलीच्या चार क्रांतिकारकांनी बिसूर ओढ्याजवळ मालगाडी पाडली. आज, शुक्रवारी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
तत्कालीन सातारा जिल्हा स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहिला होता. तेव्हाच्या दक्षिण सातारा म्हणजे आताच्या सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, आर. पी. पाटील, वि. स. पागे अशा हजारो क्रांतिकारकांनी या लढ्यात सहभाग घेतला. कधी तुरूंगवास, तर कधी भूमिगत राहून स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली होती. वसंतदादा पाटील यांनी सांगलीचा तुरूंग फोडला. दादा व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी इंग्रज पोलिसांनी गोळीबारही केला. त्यावेळी दोघेजण हुतात्मा झाले. या घटनेनंतर सांगलीत इंग्रजांच्या राजवटीविरोधात असंतोष आणखी वाढला. त्यात महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिल्याने स्वातंत्र्यसैनिक पेटून उठले. सरकारी यंत्रणा खिळखिळी करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्न करीत होते. दूरध्वनी यंत्रणेच्या तारा तोडून सरकारचा संपर्क तोडण्यात येत होता. चावड्या, सरकारी कार्यालये जाळली जात होती.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्रीसरकारच्या माध्यमातून इंग्रजांवर दहशत निर्माण केली होती. मोर्चे, आंदोलने सुरूच होती. याच काळात सांगलीत रेल्वे पाडण्यासाठी पाच जणांची बैठक झाली. सध्याच्या कापडपेठेतील पवार ड्रेसेस या दुकानात नाना जोशी, गणपती पवार, देवाप्पा खोत, धोंडीरामबापू माळी, शामगौंडा पाटील या पाचजणांनी रेल्वे पाडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
मालगाडीचा चालक ठार
सांगली-पुणे मार्गावरील बिसूर ओढ्याजवळ रेल्वेचा रूळ उखडण्याचे नियोजन करण्यात आले. पण त्यासाठी साहित्य कोठून आणायचे, असा प्रश्न होता. देवाप्पा खोत येथील गजानन मिलमध्ये कामाला होते. त्यांनी मिलमधून पाना आणण्याची जबाबदारी उचलली. ७ सप्टेंबर १९४३ रोजी धोंडीरामबापू माळी, गणपती पवार, देवाप्पा खोत, शामगोंडा पाटील बिसूर ओढ्याजवळ आले. त्यांनी रेल्वेचा रूळ उखडून टाकला. यावेळी प्रवासी रेल्वे एका स्टेशनवर थांबल्याने मालगाडी पुढे आली. बिसूर ओढ्याजवळ ही मालगाडी उलटली. यात मालगाडीचा चालक नंदपाल ठार झाला.
दोघांना अटक, दोघे भूमिगत
रेल्वे पाडल्याने इंग्रज पोलिसांनी या क्रांतिकारकांचा शोध सुरू केला. गणपती पवार यांच्या दुकानासमोर तीन दिवस पहारा ठेवला होता. पवार यांच्या दुकानात धोंडीरामबापू, शामगौंडा पाटील येत होते. तीन दिवसानंतर गणपती पवार व शामगौंडा पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस ठाण्यात त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. धोंडीरामबापू माळी व देवाप्पा खोत भूमिगत झाले. माळी व खोत यांना पकडून देणाऱ्यास ब्रिटिश सरकारने ५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. पण हे दोघेही दोन वर्षे भूमिगत होते. त्यानंतर त्यांना मिरज येथे अटक करण्यात आली. आज या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.