खराब रस्त्यांच्या दुरुस्तीवर स्थायी सदस्य संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:30 AM2021-08-19T04:30:40+5:302021-08-19T04:30:40+5:30
सांगली : अतिवृष्टी, महापुराने बाधित झालेल्या शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीवरून बुधवारी स्थायी समिती सदस्यांत नाराजी उफाळून आली. प्रशासनाने काही ठराविक ...
सांगली : अतिवृष्टी, महापुराने बाधित झालेल्या शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीवरून बुधवारी स्थायी समिती सदस्यांत नाराजी उफाळून आली. प्रशासनाने काही ठराविक रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर संताप व्यक्त करीत मिरज व कुपवाडमधील रस्त्यांच्या दुरुस्तीचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली. सभापती पांडुरंग कोरे यांनी सदस्यांच्या उपसूचना घेऊन रस्ते दुरुस्तीसाठी निविदा काढण्यास मंजुरी दिली.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नुकताच आलेला महापूर आणि जोरदार पावसामुळे सांगली मिरजेतील अनेक रस्ते खराब झाले आहेत. प्रशासनाने १२ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ९४ लाख रुपयांची निविदा काढण्यास मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. या यादीत कुपवाडमधील रस्त्यांचा समावेश नसल्याने सदस्य शेडजी मोहिते, गजानन मगदूम संतप्त झाले. कुपवाडला पूर आला नसला तरी काही रस्ते खराब झालेले आहेत, ते रस्ते यात का धरले नाहीत? असा जाब विचारला. करण जामदार, प्रकाश मुळके यांनी काही रस्त्यांचा समावेश करण्याची मागणी केली.
त्यावर सभापती कोरे यांनी कुपवाड आणि मिरजेतील रस्त्यांचा समावेश करण्यास सहमती दर्शवत तशी उपसूचना देण्याची सूचना केली. त्यानुसार आणखी सहा - सात रस्त्यांच्या दुरुस्तीचा समावेश होणार असून, सुमारे दीड कोटीचा खर्चही वाढणार आहे. गुंठेवारी व उपनगरातील रस्त्यांच्या मुरुमीकरणाचा दोन कोटी ९१ लाख रुपयांच्या प्रस्तावालाही सभेत मंजुरी देण्यात आली. हे रस्ते दीड फूट उंचीचे होणार असल्याचे सभापती कोरे यांनी सांगितले.
चौकट
शंभर कोटीतील रस्त्यांचा समावेश
प्रशासनाने तयार केलेल्या खराब रस्त्यांच्या यादीत शंभर कोटीच्या निधीतून केलेल्या काही रस्त्यांचा समावेश आहे. हे रस्ते वर्ष ते दीड वर्षापूर्वीच करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून नियमानुसार देखभाल - दुरुस्तीअंतर्गत या रस्त्याची दुरूस्ती करून घ्यावी, अशी सूचनाही सदस्यांनी केली.
चौकट
हे आहेत रस्ते
१. सांगली शास्त्री चौक ते सिव्हिल हाॅस्पिटल चौक
२. पटेल चौक ते काॅलेज कॉर्नर
३. काॅलेज काॅर्नर ते आपटा पोलीस चौकी
४. आपटा पोलीस चौकी ते काँग्रेस भवन
५. कन्या प्रशाला ते राम मंदिर चौक
६.सिव्हिल चौक ते शंभर फुटी रोड
७. पुष्पराज चौक ते हाॅटेल पै प्रकाश
८. मिरज शिवाजी रोड ते चप्पल मार्केट चौक
९. बसवेश्वर चौक ते आण्णाभाऊ साठे पुतळा
१०. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते बसवेश्वर पुतळा
११. वंटमुरे काॅर्नर ते हिरा हाॅटेल
१२. शास्त्री चौक परिसर