वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील उपक्रमशील शेतकरी बाजीराव मार्तंड पाटील, उपसरपंच शुभांगी बाजीराव पाटील यांनी स्वत:च्या तीन एकर जमिनीमध्ये वैयक्तिक पाणी निचरा प्रकल्प राबविला आहे. यासाठी त्यांना अंदाजे २ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन जमिनीचा पोत व दर्जा सुधारणार आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.वाटेगाव येथील विठ्ठलनगर (खोरी विभाग) बेंद शिवारामध्ये पाटील यांची तीन एकर काळी कसदार जमीन आहे. परंतु पावसाळ्यामध्ये जमीन लवकर वापशास येत नाही. यावर्षी त्यांनी या क्षेत्रात असणाऱ्या जुन्या विहिरीची खुदाई केली. त्यातील निघालेला मुरूम व दगड त्यांनी आपल्या जमिनीमध्ये पूर्व-पश्चिम १८०० फूट लांब, ६ फूट रुंद व ७ फूट खोल जेसीबीने चर काढून चरीमध्ये तळापासून ३ फूट भरून घेऊन, त्यावर माती पसरून शेत तयार केले आहे. या पाण्याचा निचरा त्यांनी शेतापासून वाहणाºया ओघळीमध्ये केला आहे. यामुळे जमिनीत पावसाळ्यात असणाºया अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पावसाळ्यात सुद्धा जमिनीमध्ये वापसा येणार आहे. यामुळे जमिनीची सुपीकता वाढणार आहे. यामुळे भविष्यात जमीन क्षारपड होणार नाही. या पाणी निचरा प्रकल्पामुळे परिसरातील १५ ते २0 शेतकऱ्यांच्या अंदाजे १०० एकर जमिनीला फायदा होणार आहे.
वाटेगावात साकारलाय वैयक्तिक पाणी निचरा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:32 PM