लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : राज्यात व जिल्ह्यातील वाढत्या कोरोनामुळे संभाव्य लॉकडाऊनची भीती तसेच गावोगावच्या यात्रा, जत्रा रद्द झाल्याने कोथिंबिरीला ग्राहक मिळेनासे झाले आहेत. आठवडी बाजारातही कोथिंबीर मोठ्या प्रमाणात यायला लागल्यामुळे व्यापारी कोथिंबीर दर पडले आहेत. हा तोटा पाहून येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील गोरखनाथ गुरव यांनी आपल्या १० गुंठे शेतातील कोथिंबिरीवर चक्क नांगर फिरवला.
येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव हे उत्तम शेतकरी आहेत. आपल्या जमिनीमध्ये ते वेगवेगळ्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. त्यांनी आपल्या १० गुंठे शेतीमध्ये कोथिंबिरीची पेरणी केली होती. सध्या मार्चचा हंगाम हा यात्रा-जत्रांचा असल्यामुळे कोथिंबिरीला चांगला भाव मिळतो. या हेतूने त्यांनी दीड महिन्यापूर्वी गुंटूर जातीच्या देशी धन्याची पेरणी केली होती; परंतु दराअभावी त्या शेतीवर अक्षरश: नांगर फिरवला.
चाैकट
अफवा टाळा
वास्तविक पाहता कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या नियमावलीप्रमाणे मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करून सोशल डिस्टन्सिंग राखत आपली, आपल्या कुटुंबाची व समाजाची सर्वांनी काळजी घेतल्यास आपण कोरोनापासून आपला बचाव करू शकतो. शासनालाही लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागणार नाही. तसेच लॉकडाऊन होणार अशी अफवा पसरवून गुरव यांच्यासारख्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची सर्वांनी काळजी घेणेही गरजेचे आहे.