सांगली जिल्ह्यातील आणखी ५७ पोलिस रडारवर, कारवाईचे जाळे : पोलिसप्रमुखांची वसुली कलेक्टरांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:21 PM2017-12-18T13:21:46+5:302017-12-18T13:28:16+5:30

राजकीय आश्रय आणि वशिलेबाजीच्या जोरावर वर्षानुवर्षे जाईल त्या पोलिस ठाण्यात वसुली कलेक्टरचे काम करणारे सांगली जिल्ह्यातील आणखी ५७ पोलिस जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांच्या या कारवाईच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. शुक्रवारी शर्मा यांनी १४ जणांच्या बदल्या करुन बेकायदेशीर काही चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

Police detectives recovered more than 50 police radars in Sangli district | सांगली जिल्ह्यातील आणखी ५७ पोलिस रडारवर, कारवाईचे जाळे : पोलिसप्रमुखांची वसुली कलेक्टरांवर नजर

सांगली जिल्ह्यातील आणखी ५७ पोलिस रडारवर, कारवाईचे जाळे : पोलिसप्रमुखांची वसुली कलेक्टरांवर नजर

googlenewsNext
ठळक मुद्देआणखी ५७ पोलिस कारवाईच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता१४ वसुली कलेक्टरच्या तडकाफडकी बदल्या, पोलिस दलात खळबळ सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागात अजूनही जुने कलेक्टरप्रामाणिक पोलिसांनी केले कारवाईचे स्वागत

सचिन लाड

सांगली : राजकीय आश्रय आणि वशिलेबाजीच्या जोरावर वर्षानुवर्षे जाईल त्या पोलिस ठाण्यात वसुली कलेक्टरचे काम करणारे सांगली जिल्ह्यातील आणखी ५७ पोलिस जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांच्या या कारवाईच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी शर्मा यांनी १४ जणांच्या बदल्या करुन बेकायदेशीर काही चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे. अजूनही जिल्ह्यात ५७ वसुली कलेक्टर असल्याची माहिती शर्मा यांना मिळाली आहे. ते चौकशी करून यादी तयार करीत आहेत.

कधीही गणवेश परिधान करायचा नाही, पोलिस ठाण्यातील कोणतेही काम नाही, बंदोबस्त नाही, असे काम करणारे पोलिस म्हणजे वसुली कलेक्टर. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा पोलिस दलात हे पद अस्तित्वात आहे. कलेक्शनवाला असेही त्याला संबोधले जाते. साहेबांच्या पुढे-मागे करण्याशिवाय ते कोणतेच काम करीत नाहीत.

पोलिस ठाण्यातील रेकॉर्ड, गुन्ह्याचा पंचनामा व जाब-जबाब याचे कोणतेही काम त्यांना जमत नाही. पोलिस ठाण्यात येऊन गेले की, त्यांची हजेरी लागते. त्यांना का रे म्हणण्याचे कुणाचे धाडस होत नाही. असा त्यांचा तोरा असतो. पूर्वी एक नाही, तर दोघे असत, पण आता अनेक पोलिस ठाण्यात सहा ते सात कलेक्श्नवाले झाले आहेत. डीबी शाखेत त्यांची नियुक्ती दाखविली जाते. मात्र प्रत्यक्षात ते नुसते वसुलीचे काम करतात.

अवैध धंदेवाल्यांसोबत त्यांची नेहमी उठबस असते. शर्मा यांनी अशा १४ जणांची तडकाफडकी बदली केल्याने पोलिस दलात खळबळ माजली आहे. रात्री उशिरापर्यंत या कारवाईची चर्चा रंगली होती.

जिल्ह्यात २५ पोलिस ठाणी आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात असे पद निर्माण केले आहे. त्यातील एखाद्याची बदली झाली, तर त्या पदावर वर्णी लावून घेण्यासाठी चढाओढ असते. सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलिस अजूनही हेच काम करीत आहेत.

शर्मा यांची या पोलिसांवर आता नजर गेली आहे. कारवाईचा पहिला टप्पा म्हणून १४ पोलिसांना दणका दिला आहे. अजूनही शर्मा यांच्या जाळ्यात ५० जण अडकण्याची शक्यता असल्याची पोलिस दलात चर्चा आहे.

एलसीबीत जुने कलेक्टर

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागात अजूनही जुने वसुली कलेक्टर कार्यरत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. वर्षानुवर्षे त्यांनी सांगली शहर परिसरातील पोलिस ठाण्यातच सेवा बजावली आहे.

जत, आटपाडी व उमदी भागात जरी त्यांची बदली झाली तरी, ते वशिलेबाजीच्या जोरावर पुन्हा सांगलीतच आले आहेत. काहीजण वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील सव्वानऊ कोटी रुपयांच्या रकमेवरील डल्ला प्रकरणात सीआयडीपुढे चौकशीला सामोरे जाऊन आले आहेत. पण अजूनही ते एलसीबीत तळ ठोकून आहेत.

कारवाईचे स्वागत

शर्मा यांनी पोलिसप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारून एक महिना पूर्ण झाला आहे. महिन्याभरात त्यांनी पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या. कर्मचाऱ्यांच्या अचडणीबाबतही विचारपूस केली. त्यांच्या या आपुलकीमुळे प्रामाणिक पोलिस भारावून गेले आहेत. यातच १४ जणांच्या बदल्या झाल्यानंतर याच प्रामाणिक पोलिसांनी कारवाईचे स्वागत केले.

 

Web Title: Police detectives recovered more than 50 police radars in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.