पोलीस बंदोबस्तात पार पडली ‘पोलिसां’ची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:30 AM2021-09-22T04:30:25+5:302021-09-22T04:30:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ७७ चालक पदासाठी मंगळवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ७७ चालक पदासाठी मंगळवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षा केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोरोना नियमांचे पालन करीत परीक्षा पार पडल्या.
कोरोनामुळे २०१९ मधील पोलीस भरती लांबणीवर गेली होती. शासनाच्या आदेशानुसार रखडलेली परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील ७७ चालक पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. यंदा प्रथमच शारीरिक चाचणीआधी लेखी परीक्षा घेण्यात आली. ७७ जागांसाठी ११ हजार २०९ उमेदवारांनी अर्ज केले होते. सकाळी सात ते नऊ या वेळेत उमेदवार केंद्रावर हजर झाले. प्रत्येक उमेदवाराची तपासणी करून तसेच कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा केंद्रात सोडण्यात आले.
शंभर गुणांची वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा झाली असून, यातील ७७० पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी ८७४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंदोबस्त होता. त्यात अप्पर पोलीस अधीक्षक, पाच उपअधीक्षक, २० निरीक्षक, ५५ सहायक फौजदार, ७५८ अंमलदार, ३३ महिला कर्मचारी यांचा समावेश होता. दरम्यान, गुरुवारी (ता. २३) पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.