‘धूम’ टोळीपुढे पोलीस हतबल

By admin | Published: October 8, 2015 11:48 PM2015-10-08T23:48:11+5:302015-10-09T00:46:24+5:30

गुन्ह्यांची मालिका : महिला टार्गेट; चोरट्यांनी बदलली वेळ; नाकाबंदी करुनही पोलिसांना चकवा

Police force in front of 'Dhoom' gang | ‘धूम’ टोळीपुढे पोलीस हतबल

‘धूम’ टोळीपुढे पोलीस हतबल

Next

सचिन लाड -- सांगली -‘धूम’ टोळीने पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत तीन महिलांच्या गळ्यातील सहा तोळ्यांचे दागिने हातोहात लंपास केले. टोळीतील गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. पाच-सहा फुटावर पोलीस असतानाही ते अगदी सहजपणे महिलांचे दागिने लंपास करीत आहेत. या टोळीने वेळ बदलून गुन्ह्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. पोलिसांना या गुन्हेगारांचे धागेदोरे सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्यासमोर पोलीस हतबल झाले असल्याचे चित्र आहे.
पेन्शन मिळवून देतो, असे आमिष दाखवून वृद्ध महिलांना दुचाकीवर बसवून नेणे, पोलीस असल्याची बतावणी करुन पुढे खून झाला आहे, तपासणी सुरु आहे, दागिने काढून ठेवा, असे सांगून चोरट्यांनी लुबाडणुकीचे गुन्हे केले आहेत. याशिवाय दुचाकीवरून येऊनही अवघ्या तीन-चार सेकंदात महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले जात आहेत. केवळ विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सर्वाधिक गुन्हे घडत आहेत. गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत बदलत आहे. नवीन गुन्हेगारांचे रेकॉर्डच नसल्याने त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचण्यासाठी कोणताच धागा सापडत नाही. बँक ग्राहकांना लुटण्याचे अनेक गुन्हे घडले आणि घडत आहेत; पण एकाही गुन्ह्याचा छडा लावता आलेला नाही. केवळ गुन्हे होऊ नयेत, यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसतात.
गुन्हेगारांना पकडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी, त्यामध्ये ते सातत्य ठेवत नाहीत. गुन्हे घडले की, चार-आठ दिवस गतीने तपास केला जातो. मात्र पुन्हा ते मागे पडतात. पोलिसांच्या कामाची पद्धत या गुन्हेगारांनाही समजून आलेली नाही. त्यामुळे ते वेळ बदलून व परिस्थिती पाहून एक-दोन ठिकाणी हात मारुन पसार होत आहेत. गस्त पथके २४ तास फिरतात. तरीही गुन्हेगार सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांच्या आतापर्यंतच्या गुन्ह्यात त्यांनी काळ्या रंगाच्या दुचाकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना टार्गेट केले होते. त्यामुळे पोलिसांनी भल्या पहाटे बंदोबस्त लावला होता; पण पोलिसांपेक्षा हे गुन्हेगार हुषार निघाले. त्यांनी दोन महिने विश्रांती घेऊन तीन दिवसांपूर्वी सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांना टार्गेट केल्याचे दिसून येते. यामुळे नेहमी पोलीसांना चोरट्यांनी चकवा देण्याचे काम केले आहे.



आता संशयितांवर वाटमारीचे गुन्हे
महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला जायचा; पण हे गुन्हे नेहमी घडू लागले. गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, त्यांच्याकडून पुन्हा गुन्हे होऊ नयेत, यासाठी गुन्ह्याचे कलम बदलण्यात आले. चोरीऐवजी वाटमारीचे गुन्हे दाखल केले जाऊ लागले आहेत. वाटमारीच्या गुन्ह्यांमुळे किती महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास झाले, याची स्वतंत्र आकडेवारी पोलिसांकडे नाही. तरीही गेल्या नऊ महिन्यांत २० गुन्हे घडल्यास अंदाज आहे.

नुसते आवाहन
‘धूम’ टोळीतील गुन्हेगार कोण आहेत? ते कोठून येतात? या बाबी पोलिसांच्या तपासातून अद्याप पुढे आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत त्यांच्याबद्दल कोणतेही धागेदोरे सापडत नाहीत. गुन्हे होऊ नयेत, यासाठी पोलीस महिलांना परगाव व बाजारात जाताना महागडे दागिने घालून जाऊ नका, असे आवाहन करीत आहेत. पण अलीकडच्या काळात महिलांचे त्यांच्या घराजवळ जाऊन दागिने लंपास होत आहेत. महिलांनी काय करावे? हे आवाहन करण्याशिवाय पोलिसांना काहीच जमत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Police force in front of 'Dhoom' gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.