ATM कार्डद्वारे फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, एलसीबीची कारवाई
By शरद जाधव | Published: October 11, 2022 07:14 PM2022-10-11T19:14:35+5:302022-10-11T19:15:14+5:30
ATM कार्डद्वारे फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.
सांगली : जिल्ह्यातील अनेक भागांत बँक एटीएम कार्डची आदलाबदल करून त्याद्वारे पैशावर डल्ला मारणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केले. संभाजी गोविंद जाधव (वय ३७, रा. चंद्रसेननगर, विटा) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून विविध कंपन्यांची तब्बल १०१ एटीएम कार्डसह तीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एटीएम कार्डवर पैसे काढताना फसवणुकीचे प्रकार वाढले होते. याचा तपास करून आरोपींवर कारवाईसाठी एलसीबीने खास पथक तयार केले होते. पथक गस्तीवर असताना, संशयित जाधव हा तासगाव रोडवरून सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली. माधवनगरजवळ त्याला सापळा लावून थांबवत चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित जाधव हा एटीएम केंद्रात जाऊन पैसे काढून देतो म्हणून नागरिकांची कार्ड घेत असे व हातचलाखीने त्याची आदलाबदल करून तो कार्ड आपल्याकडे घ्यायचा. त्यानंतर त्या कार्डवरून तो पैसे काढून घेत असे किंवा पेट्रोलपंपावर त्याचा वापर करत असे. अशी काढलेली तीन लाखांची रोकड यावेळी त्याच्याजवळ सापडली. जाधव याने तासगाव, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, जयसिंगपूर, शिवाजीनगर व म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे गुन्हे केल्याची कबुली दिली.
एटीएम कार्डचा ढीग
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास पवार, बिरोबा नरळे, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, सागर लवटे, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता एका पिशवीत वेगवेगळ्या बॅकांची १०१ एटीएम कार्ड त्याच्याजवळ सापडली. यासह गुन्ह्यात वापरत असलेली ५० हजार रुपये किमतीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
आणखी गुन्हे उघडकीस येणार
संशयित जाधव याच्याकडून आतापर्यंत सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत. केवळ एटीएमद्वारे फसवणूकच नव्हे तर मोटारसायकलची चोरी व घरफोडीचेही गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.