सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती गंभीर बनत असतानाच रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलिसाचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर मिरजेत उपचार सुरू होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील पोलिसाचा हा पहिला मृत्यू आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात लघू टंकलेखक म्हणून कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यावर मिरज कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाच्या नियंत्रणासाठी पूर्णवेळ पोलीस कार्यरत आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचारी बाधित होणार नाहीत यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. गेल्यावर्षी कोरोनाने सहा पोलिसांचा मृत्यू झाला होता. सध्या तीन अधिकारी आणि दहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या वर्षातील कोरोनाने पोलिसाचा हा पहिलाच मृत्यू झाल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.