कोथळे खून प्रकरणातील पोलीस अधिकारी युवराज कामटेचा न्यायालयात उद्दामपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 04:47 AM2018-09-11T04:47:47+5:302018-09-11T04:47:51+5:30
पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा उद्दामपणा अजूनही कायम आहे.
सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा उद्दामपणा अजूनही कायम आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी त्याने ‘दोषारोप पत्रात आपण बदल कराल,’ असा संशय भर न्यायालयात व्यक्त करून, न्यायदेवतेवरच अविश्वास दाखविला. न्यायालयाने त्याच्या या बोलण्याचा समाचार घेत त्याला चांगलेच झापले. याशिवाय त्याला बाहेरही काढले. दरम्यान, मंगळवार दि. ११ रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
सांगली पोलिसांनी लूटमारीच्या गुन्ह्यात ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला कोठडीत बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळला होता.
>आज पुरवणी दोषारोपपत्र
उज्ज्वल निकम, म्हणाले की, सीआयडीने संशयितांविरुद्ध आणखी भक्कम पुरावे गोळा केले आहेत. मंगळवारी त्याबाबत पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.