नदीत पोहणाऱ्या २८ जणांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:02+5:302021-07-18T04:19:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत, तरीही निर्बंध झुगारून पोहण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत, तरीही निर्बंध झुगारून पोहण्यासाठी नदीवर पोहण्यासाठी गर्दी करणाऱ्या २८ जणांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. सकाळच्या वेळी पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने, पोहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. याच वेळी शहर पोलिसांनी ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्यांवरही कारवाई केली.
जिल्ह्यातील कोरोनास्थिती कायम असून, रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी ठरत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने आठवड्याच्या मध्यापासूनच आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. निर्बंध लागू करूनही ते झुगारून शहरात फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची दुचाकी जप्त करण्याबरोबरच दंडही केला जात आहे.
शनिवारी कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी तरुण जमल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तत्काळ तिथे जात त्यांच्यावर कारवाई केली. कोरोना कालावधीत पाेहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन करत समज देऊन नागरिकांना सोडण्यात आले. यापुढेही पोहण्यासाठी येणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला.
पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहायक निरीक्षक गजानन कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.