प्रदीप पोतदार - कवठेएकंद---ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे कवठेएकंद (ता. तासगाव) येथे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आजवरच्या निवडणुका शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये रंगल्या आहेत. आता मात्र लोकसभा निवडणुकीनंतर खा. संजय पाटील यांच्या गटाला अधिकच बळ मिळाले असून, यानिमित्ताने प्रथमच भाजप आपली किस्मत अजमावणार आहे.तालुक्यातील माजी गृहमंत्री आर. आर. पाटील गट राष्ट्रवादी काँग्रेस व खा. संजय पाटील यांचा गट भाजपच्या रुपाने आमने-सामने बहुतांशी गावांमध्ये लढणार आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथेच मात्र शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत असल्याने तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.ग्रामपंचायतीच्या आजवरच्या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे अधिकच पारडे जड राहिले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गतवेळी पारडे जड होते. परंतु यावेळी दोन सदस्यांनी भाजपकडे कौल दिल्याने काही काळासाठी शेकापला सरपंचपद द्यावे लागले आहे.सध्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेकाप व राष्ट्रवादीने आपल्या स्वबळाचा पवित्रा स्पष्ट केला आहे., तर नव्याने रिंगणात उतरणाऱ्या भाजपने स्वबळाची घोषणा करुन ‘हम भी कुछ कम नहीं’ असा संकेत दिला आहे. ज्या-त्या पक्षाने आपापल्या उमेदवारांची चाचपणी केली आहे, तर काहींनी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे अनेक प्रभागात वेगवेगळे परिणाम दिसणार आहेत, तर पहिल्यांदाच त्रिशंकू निवडणुकीमुळे वेगळे परिणाम जाणवणार असल्याचे भाकीत जाणकारांतून व्यक्त होत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपची प्रथमच एन्ट्रीलोकसभेच्या निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीत आजवर कधीही न दिसलेले कमळ फुलविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे. खा. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणुकीचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे शेकाप, राष्ट्रवादी यांच्या सत्तासंघर्षात भाजपची प्रथमच एन्ट्री होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.भाजपपाठोपाठ शेकाप व राष्ट्रवादीची पुरेपूर तयारी चालली असल्याने निवडणुकांच्या तारखांप्रमाणे अधिकच रंगत वाढणार आहे. याची उत्सुकता ग्रामस्थांत आहे.पक्षाने आपापल्या उमेदवारांची चाचपणी केली आहे, तर काहींनी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे अनेक प्रभागात वेगवेगळे परिणाम दिसणार आहेत.
कवठेएकंद ग्रामपंचायतीमध्ये राजकीय वातावरण तापले
By admin | Published: October 08, 2015 11:16 PM