पॉलिटेक्निकचे तंत्र बिघडणार, १५ दिवसांत ५ टक्के विद्यार्थ्यांचेच अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:18 AM2021-07-18T04:18:57+5:302021-07-18T04:18:57+5:30
संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीही गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १५ ...
संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीही गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १५ दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पुरेसा दिसत नाही. त्यामुळे यावर्षीही प्रवेशाचे तंत्र बिघडण्याची चिन्हे आहेत.
३० जूनपासून तंत्रनिकेतनमध्ये पदविका प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीचा निकाल लागला नाही तरीही विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाने केले होते. त्यानुसार ऑनलाइन पोर्टल सुरूदेखील झाले. दहावीच्या परीक्षा मंडळाने दिलेला आसनक्रमांक नोंदवून अन्य सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यामध्ये आधार कार्डापासून जातीचा दाखला, क्रिमिलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रांचा समावेश आहे. तंत्रनिकेतन स्तरावर त्याची छाननी झाल्यानंतर त्रुटींची माहिती दिली जाते. त्रुटी पूर्ण केल्यानंतर प्रवेश निश्चित होतो. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे.
विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाविषयी अंदाज नसल्याने ते गोंधळात होते, आता निकाल स्पष्ट झाल्याने गती येणार आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना भरभक्कम गुण मिळाल्याने आता त्यांचा पुढील शिक्षणक्रम निश्चित होईल. दहावीच्या मूल्यांकनाच्या नव्या पॅटर्नमुळे यंदा न ९९.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यामुळे अकरावीच्या जागा हाऊसफुल्ल होतील. परिणामी तंत्रनिकेतनकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त असेल. शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर होताच तंत्रनिकेतनच्या संकेतस्थळावर गर्दी दिसून आली. निकाल जास्त लागण्याने पदविका अभियांत्रिकीच्या सरकारी व खासगी जागा १०० टक्के भरण्याची महाविद्यालयांना अपेक्षा आहे.
बॉक्स
दहावीचा निकाल लागल्याने येणार गती
- पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाला दहावीच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने गती आली. शुक्रवारी (दि. १६) निकाल ऑनलाइन स्वरूपात जाहीर झाला.
- मूल्यांकनाचा नवा पॅटर्न विद्यार्थ्यांना भलताच फलदायी ठरला आहे. सर्रास विद्यार्थी उत्तीर्ण होणार झालेत, त्यामुळे प्रवेशासाठी रस्सीखेच होण्याचा अंदाज आहे.
- दहावीत किती गुण मिळतील यावर पुढील शिक्षणक्रमाची दिशा निश्चित होते, त्यामुळे पदविका प्रवेशाचे नेमके चित्र दहावीच्या निकालानंतर आता एक-दोन दिवसांत पुरेसे स्पष्ट होईल.
बॉक्स
गेल्यावर्षी ५० टक्के जागा रिक्त
गेल्यावर्षी दहावीचा निकाल उच्चांकी लागला होता, तरीही पदविका अभियांत्रिकीच्या सुमारे ५० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. सर्व सरकारी महाविद्यालये आणि काही प्रतिष्ठित खासगी महाविद्यालयांमध्ये जागा फुल्ल झाल्या, पण अन्य खासगी महाविद्यालयांना मात्र विद्यार्थी मिळविण्यासाठी बऱ्याच कसरती कराव्या लागल्या. त्यानंतरही काही विशिष्ट ट्रेडच्या जागा रिकाम्याच राहिल्या होत्या.
बॉक्स
फेब्रुवारीमध्येच मिळालेत आसनक्रमांक
- अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी दहावीच्या निकालापूर्वीच ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी बोर्डाने दिलेला आसनक्रमांक आता पदविका प्रवेशासाठी पुरेसा ठरणार आहे.
- बोर्डाने सर्वच विद्यार्थ्यांना फेब्रुवारीमध्येच आसनक्रमांक दिले आहेत. त्याच्याआधारे तोंडी परीक्षाही झाल्या आहेत. हा क्रमांक पदविकेसाठी नोंदवावा लागेल.
कोट
बंपर निकाल डिप्लोमाच्या पथ्यावर
दहावीच्या निकालात चांगले गुण मिळाले आहेत, पण निकाल लागण्यापूर्वीच डिप्लोमासाठी ऑनलाइन प्रवेश नोंदवला होता. सर्व कागदपत्रेही अपलोड केली आहेत. आता प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेला जाईन. दहावीचा निकाल लागेपर्यंत गुणांविषयी अंदाज नव्हता, त्यामुळे डिप्लोमा प्रवेशाविषयी सांशक होतो, पण आता शासकीय महाविद्यालयातही प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे.
- विनय बसागरे, विद्यार्थी, मिरज
डिप्लोमासाठी प्रवेश घ्यायचे निश्चित केले आहे. दहावीला चांगले गुण मिळालेत. एकूण निकाल चांगला लागल्याने डिप्लोमाचे मेरीट वाढू शकते, पण खासगी महाविद्यालयात भरपूर जागा असल्याने प्रवेश मिळण्याविषयी खात्री आहे. सांगली मिरजेतील तसेच शासकीय महाविद्यालयांना प्राधान्य देणार आहे. खासगी महाविद्यालयांचे शुल्क परवडणारे नाही.
- नेहा गोसावी, विद्यार्थिंनी, कुपवाड
डिप्लोमाची प्रवेशप्रक्रिया दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच सुरू झाली आहे, त्यासाठी कोणतीही सीईटी देण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी. त्यासाठी दहावीचा बोर्डाने दिलेला आसनक्रमांक पुरेसा आहे.
प्राचार्य कॅप्टन डॉ. नितीन सोनजे, नोडल अधिकारी तथा प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, मिरज पॉईंटर्स
जिल्ह्यातील पॉलिटेक्निक - १६
प्रवेशक्षमता ४, ६२८
दरवर्षीचे सरासरी प्रवेश २,३००
अर्ज करण्याची अखेरची मुदत २३ जुलै