रिमझिम पावसाचा डाळिंब बागांना फटका, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 04:32 PM2022-07-19T16:32:28+5:302022-07-19T17:20:36+5:30

उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

Pomegranate orchards hit by drizzle in Jat taluk, outbreak of fungal disease | रिमझिम पावसाचा डाळिंब बागांना फटका, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

रिमझिम पावसाचा डाळिंब बागांना फटका, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

googlenewsNext

संख : जत तालुक्यात गेली दहा दिवसांपासून रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागांना फटका बसला आहे. बिब्या, ऑटक बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. फूल, कळीची गळती सुरू झाली आहे. उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे.

तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र १२ हजार २२१ एकर आहे. शेतकऱ्यांनी उजाड फोंड्या माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. उमदी, दरीबडची, काशिलिंगवाडी, शेगाव, वाळेखिंडी, बेवणूर, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, संख, निगडी बुद्रूक या परिसरात डाळिंब बागा आहेत. गत तीन वर्षांत पिन होल बोरर, मर रोगाने तालुक्यातील पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील बागा वाळवून गेल्याने काढून टाकल्या आहेत.

शेतकरी पर्याय पिकाच्या शोधात आहे. गेली दोन वर्षांपासून कोरोना संकटाच्या चक्रव्यूहात डाळिंब बागायतदार सापडला होता. सध्या डाळिंबाला चांगला भाव आहे. शेतकरी भाव मिळेल अशी आशा बाळगून होता. पण आता रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे बागांना फटका बसला आहे. बिब्या, ऑटक बुरशीजन्य रोग वाढवून फूल, कळीची गळती झाली आहे.

फवारणीही रेंगाळली

बागांचा हंगाम वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. रोगांचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी फवारणी घेण्यासाठी दोन ते चार तासही पावसाची उघडीप मिळत नाही. झाडावर पाण्याचे थेंब साचून राहत असल्याने फवारणीच घेता येत नाही. फवारणीला पावसाची उघडीप मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
 

रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरणामुळे बिब्या, ऑटक, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव डाळिंब बागांवर झाला आहे. उत्पादनात घट झाली आहे. लाखो रुपयांचा फटका बसला आहे. - आप्पासाहेब चिकाटी, डाळिंब उत्पादक शेतकरी, दरीबडची

Web Title: Pomegranate orchards hit by drizzle in Jat taluk, outbreak of fungal disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.