सांगली : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जंगलात अर्धवट जळालेल्या अनिकेतच्या मृतदेहाच्या अस्थी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाने पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. या अस्थी अनिकेतच्या कुटुंबियांनी ताब्यात घ्याव्यात, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. पण कुटुंबाने त्याबाबत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. अनिकेतचा मृतदेहच ताब्यात द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला नग्न करुन उलटा टांगून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे जंगलात नेऊन जाळला होता. तसेच अनिकेत व अमोल पोलिस कोठडीतून पळून गेल्याचा बनाव रचला होता. ७ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी ८ नोव्हेंबरला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली होती. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत कळंबा कारागृहात आहेत. या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीआयडीचे पथक करीत आहे.सांगली पोलिसांनी आंबोलीत घटनास्थळी भेट दिल्यानंतर, अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. कामटे व लाडने ७ नोव्हेंबरला सकाळी दहा ते अकरा या वेळेत हा मृतदेह जाळला होता. तो व्यवस्थित जळाला नाही, म्हणून पुन्हा पेट्रोल आणून दुसºयांदा तो जाळला होता. पोलिसांनी पंचनामा करुन अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन तो विच्छेदन तपासणीसाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला होता. विच्छेदन तपासणी झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली होती.तसेच मृतदेहावर सांगली शहर पोलिस ठाण्यासमोर अंत्यसंस्कार करणार असल्याचा इशारा दिला होता. मृतदेह अर्धवट जळाला असल्याने तो न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विच्छेदन तपासणीनंतर केवळ अस्थीच राहिल्या आहेत.संशयितांना आणणारपोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह या प्रकरणातील पोलिस अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झाकीर पट्टेवाले यांंंना ६ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात ठेवले आहे. दि. ६ रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
अनिकेत कोथळेच्या अस्थी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:58 PM