इस्लामपुरात तोफा धडाडण्याच्या अगोदरच थंडावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:12 PM2022-07-18T16:12:55+5:302022-07-18T16:14:29+5:30
जयंत पाटील यांची जयंत एक्स्प्रेस इच्छुक कार्यकर्त्यांनी फुल झाली होती. त्यानंतर शिवसेनेतील बंडाळीने महाविकास आघाडीला धक्का बसला. त्यामुळेच जयंत एक्स्प्रेसमधील काही डबे रिकामे झाल्याची चर्चा आहे.
अशोक पाटील
इस्लामपूर : शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील श्रेयवाद चांगलाच पेटला आहे. ऑगस्टमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या, तर आता शिंदेशाही सरकार आल्यानंतर निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. पालिकेसाठी शहरात धडाडणाऱ्या तोफा आता पुन्हा थंडावल्या आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगराध्यक्ष, सरपंच या निवडी सदस्यांतूनच होणार असल्याचे जाहीर केले होते, तर पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम ऑगस्ट २०२२ मध्ये जाहीर झाला होता. त्यामुळे इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप, महाडिक गट आणि काँग्रेसने फिल्डिंग लावली होती, तर तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांची जयंत एक्स्प्रेस इच्छुक कार्यकर्त्यांनी फुल झाली होती. त्यानंतर शिवसेनेतील बंडाळीने महाविकास आघाडीला धक्का बसला. त्यामुळेच जयंत एक्स्प्रेसमधील काही डबे रिकामे झाल्याची चर्चा आहे.
जनतेतून नगराध्यक्ष, सरपंचपद निवडीचा निर्णय झाला; परंतु नव्यानेच होणारी प्रभाग रचना आणि आरक्षण यावर अद्यापही निर्णय झाला नाही. त्यामुळे दोन्ही गटांतील इच्छुक उमेदवारांनी संपर्क कमी केला आहे, तर राष्ट्रवादीने प्रभाग वाईज बैठकीचे सत्र सुरूच ठेवले आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्जही मागविले आहेत. शंभरहून अधिक इच्छुकांनी राष्ट्रवादीकडे आपली नावे नोंदविली आहेत; परंतु जनतेतून नगराध्यक्ष निवडी होत असल्याने दोन्ही गटाकडे सक्षम नेतृत्व नसल्याचे स्पष्ट आहे.
तरीसुद्धा राष्ट्रवादीतून माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे आणि शहराध्यक्ष शहाजी पाटील हे आर्थिक सक्षमसह नगराध्यक्ष पदासाठी लढू शकतील, असा अंदाज राष्ट्रवादीतून व्यक्त केला जात आहे. तर विकास आघाडीतून शिवसेनेचे शिंदे गटाचे आनंदराव पवार आणि महाडिक गटाचे कपिल ओसवाल, विक्रम पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते; परंतु महिला आरक्षण पडल्यास दोन्ही गटांना नेतृत्व उभा करणे तारेवरची कसरत करावी लागणार आहे.