मिरज जंक्शनमध्ये कोविड एक्स्प्रेसची तयारी पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:27 AM2021-04-27T04:27:25+5:302021-04-27T04:27:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोनाचे दररोज हजार-बाराशे रुग्ण सापडत असल्याच्या काळात कोविड एक्स्प्रेसची प्रतीक्षा वाढली आहे. खासगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोनाचे दररोज हजार-बाराशे रुग्ण सापडत असल्याच्या काळात कोविड एक्स्प्रेसची प्रतीक्षा वाढली आहे. खासगी रुग्णालयांत लाखोंची बिले भरावी लागत असल्याने गरीब रुग्णांसाठी कोविड एक्स्प्रेस जीवनरेखा ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने कोविड एक्स्प्रेसची तयारी मिरज जंक्शनमध्ये सुरू केली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागताच २१ डब्यांची कोविड एक्स्प्रेस मिरज जंक्शनमध्ये दाखल झाली. आतमध्ये सुसज्ज बेड, पंखे, पाणी आदी सोयी होत्या, रुग्ण दाखल झाल्यास प्राणवायूचे सिलिंडर व इतर सुविधाही मिळणार होत्या. सुमारे दोन महिने ही एक्स्प्रेस स्थानकात थांबून राहिली, पण एकही रुग्ण दाखल झाला नाही. रेल्वेच्या दाव्यानुसार जिल्हा प्रशासनाने त्यासाठी रेल्वेकडे विचारणाही केली नाही. त्यामुळे रेल्वेने कोविड एक्स्प्रेस माघारी नेऊन पुण्यात थांबविली.
यावर्षी पुन्हा दुसऱ्या लाटेने जिल्हा हैराण झाला आहे. शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील बेड संपत आले आहेत. महापालिकेच्या कोविड सेंटरमधील बेडदेखील मर्यादित आहेत. रुग्णांची गतीने वाढणारी संख्या पाहता विनाशुल्क बेड लवकरच संपणार आहेत. या स्थितीत गरीब रुग्णांसाठी कोविड एक्स्प्रेस महत्वाची ठरणार आहे.
चाैकट
१५ डब्यांची आयसोलेशन एक्स्प्रेस
रेल्वेने संपूर्ण पुणे विभागातच गतवर्षी आयसोलेशन एक्स्प्रेस तयार केल्या होत्या. पुण्याहून मिरजेत २१ डब्यांची कोविड एक्स्प्रेस आली होती. तिच्या वापरासाठी जिल्हा प्रशासनाने रेल्वेला विनंती केली नाही. राज्य शासनानेही पुणे विभागीय व्यवस्थापकांकडे तशी आवश्यकता व्यक्त केली नव्हती. त्यामुळे एक्स्प्रेस तशाच थांबून राहिल्या. कालांतराने परतही गेल्या. मिरजेत या एक्स्प्रेसमधील साहित्य काढून ठेवले होते. आता त्याचाच वापर करून पुन्हा आयसोलेशन एक्स्प्रेस तयार केली जात आहे. ही गाडी १५ डब्यांची आहे. विद्युतीकरण, पडदे, पाणीपुरवठा, जाळ्या आदी कामे केली जात आहेत.
चौकट
फक्त विलगीकरण, अतिदक्षता विभाग नव्हे
- आयसोलेशन एक्स्प्रेसमध्ये फक्त विलगीकरणात राहण्याची सोय असेल. प्रत्येक कम्पार्टमेन्टमध्ये दोन बेड असतील. पाणी, वातानुकुलन, स्वच्छतागृह आदी सोयी असतील.
- डॉक्टर व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची सोय जिल्हा प्रशासनाला करावी लागेल. अैाषधे, रुग्णांची दैनंदिन देखभाल, नाष्टा व जेवणही जबाबदारीही जिल्हा प्रशासनाची असेल.
- मिरजेत पीट लाईनमध्ये सध्या काम सुरू आहे. पंधरवड्यात ती पूर्ण रूप घेईल तशा सूचना पुणे विभागाकडून मिळाल्या आहेत.