नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे अल्पवयीन तरुण-तरुणीचा विवाह रोखण्यात प्रशासनाच्या जागरूकतेमुळे यश आले. संबंधिताना ताकीद देऊन अल्पवयीन असताना विवाह करणार नाही, असे लिहून घेण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान अल्पवयीन तरुण-तरुणीचा विवाह होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एम.डी. चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, अंगणवाडी पर्यवेक्षिका एस.आर. माळी, पोलीसपाटील अतुल बनसोडे यांना समजली. एम.डी. चव्हाण यांनी तातडीने हालचाली करून तरुण-तरुणींच्या वडिलांना भेटून लग्न न करण्याबाबत लेखी हमी घेतली. याच वेळी अल्पवयीन यांचा विवाह केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी समज दिली. यामुळे संबंधित वधू-वरांच्या पालकांनी अल्पवयीन असल्यामुळे हा विवाह रद्द करीत असल्याचे लेखी पत्र प्रशासनाला दिले. या पथकामध्ये गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, बालविकास प्रकल्प अधिकारी वैभव कांबळे, बालाजी बोकळवाढ, तलाठी पंडित चव्हाण, चाइल्ड लाइनचे कर्मचारी, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते, शंकर माने, अंगणवाडीसेविका यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.