प्रा. फडके म्हणाले, गेले चौदा महिने खासगी क्लासेस बंद आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व अनेक मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून अनेकवेळा निवेदने देऊन, क्लासेस सुरू करण्याची मागणी केली हाेती. मात्र, या मागणीची दखल घेण्यात येत नसल्याने पालकांच्या संमतीने आरोग्यविषयक नियमांची काळजी घेऊन राज्यातील सर्व खासगी क्लासेस २१ जूनपासून सुरू करण्याचा पवित्रा कोचिंग क्लासेस संचालक वेल्फेअर असोसिएशनने घेतला आहे.
शासनाने ५० टक्के क्षमतेने क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी क्लासचालकांची मागणी आहे. क्लासेस सुरू करताना ऑनलाईन, ऑफलाईन किंवा ऑनलाईन व ऑफलाईन असे तीनही पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्याची दहावी व बारावीची मूल्यमापन पद्धती अत्यंत दोषपूर्ण आहे. परीक्षा रद्द करण्याऐवजी पर्यायी व्यवस्था शासनाने उभी करावी. २०१८ मध्ये शासनाच्या नियमावलीतील जाचक अटी रद्द करून शिक्षणमंत्र्यांनी नवीन नियमावली तयार करण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचेही रवींद्र फडके यांनी सांगितले.
शासनाला जीएसटी, प्रोफेशनल टॅक्स व इन्कमटॅक्सच्या माध्यमातून सुमारे साडेपाच हजार कोटींचा महसूल मिळवून देणाऱ्या क्लासेसना व्यवसायाचा दर्जा मिळावा. गेले १४ महिने क्लासेस बंद असल्याने जागा भाडे, स्थानिक कर व बँकेच्या हप्त्यात शासनाने सवलत द्यावी. विविध प्रवेश परीक्षा व स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कोचिंग क्लासेसना आवश्यक सेवेचा देऊन १८ ऐवजी ५ टक्के जीएसटी आकारणी करावी. विविध स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रम रचना व निर्मितीत क्लासचालकांच्या मतांचा विचार करावा. चेंबर ऑफ कॉमर्सप्रमाणे क्लासचालकांसाठी नियमावली तयार करून कोचिंग क्लासेसची गरज लक्षात घेऊन योग्य तो दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली.