खासगी रुग्णालयांचा शुक्रवारी बंद; आयएमएचे देशव्यापी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 01:05 PM2020-12-07T13:05:21+5:302020-12-07T13:09:12+5:30
Doctor, Hospital, MedicalAsosiation, morcha, sangli आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास शासनाने परवानगी दिल्याच्या निषेधार्थ आयएमएने शुक्रवारी (दि. ११) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आयएमएशी संलग्नित सर्व खासगी रुग्णालये यादिवशी बंद राहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर यांनी ही माहिती दिली.
सांगली : आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास शासनाने परवानगी दिल्याच्या निषेधार्थ आयएमएने शुक्रवारी (दि. ११) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आयएमएशी संलग्नित सर्व खासगी रुग्णालये यादिवशी बंद राहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर यांनी ही माहिती दिली.
शस्त्रक्रियेला परवानगीच्या निमित्ताने आयएमए आणि जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन या संघटना आमने-सामने आल्या आहेत. आयएमएने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आंदोलनाचे विविध टप्पे म्हणून ८ डिसेंबरला राज्यातील प्रमुख शहरांत डॉक्टर्स शांततेने निदर्शने करतील.
मास्क, पांढरा कोट आणि स्टेथेस्कोपसह वीस-वीस डॉक्टरांचे गट आंदोलनात सहभागी होतील. दुसरा टप्पा म्हणून देशभरातील सर्व खासगी वैद्यकीय सेवा शुक्रवारी बंद राहील. कोरोनासह अतिदक्षता विभाग मात्र सुरु राहतील.
संपाला मार्ड संघटनेने पाठिंबा दिल्याचे डॉ. दोरकर म्हणाले. संपाची दखल घेतली नाही, तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा आयएमएने दिला आहे. जिल्हास्तरावरही याचिका दाखल केल्या जातील.
हे आहेत आयएमएचे आक्षेप...
आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या शासनाच्या निर्णयाला आयएमएने आक्षेप घेतला आहे. परवानगी दिलेल्या ५८ शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतल्याविना त्या करता येणार नाहीत, असा दावा केला आहे.
अपुऱ्या ज्ञानावर केलेल्या शस्त्रक्रिया रुग्णांसाठी प्राणघातक ठरतील. मेडिकल कमिशनच्या परवानगीविना शासनाने जारी केलेल्या निर्णयाला कोणताही कायदेशीर आधार नाही, असेही आयएमएने म्हटले आहे.